TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘एअरपोर्ट फनेल’भोवतीच्या ४०० इमारती सात वर्षांनंतरही नियमावली प्रतीक्षेत

मुंबई : विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’वासीयांना चार ते नऊ अतिरिक्त चटईक्षेत्रफळ देण्याच्या मुंबई महापालिकेने नगरविकास विभागाला पाठविलेला प्रस्ताव फलद्रुप होत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर आता नव्या पर्यायाचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र त्यामुळे एअरपोर्ट फनेलवासीयांच्या सुमारे चारशे इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

एअरपोर्ट फनेवासीयांच्या पुनर्विकासाचा प्रश्न नोव्हेंबर २०१६ मध्ये पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या प्रश्नावर फारशी प्रगती झालेली नाही. विलेपार्ले व सांताक्रूझ परिसरासाठी अनुक्रमे ४.४८ व ४.९७, तर कुर्ला परिसरासाठी ९.२२ चटईक्षेत्रफळ प्रस्तावित करणारा पर्याय पालिकेने तयार केला. मात्र या परिसरात इमारतीच्या उंचीवर बंदी असल्यामुळे हे चटईक्षेत्रफळ वापरता येणे शक्य नव्हते. या निमित्ताने निर्माण होणारा विकास हक्क हस्तांतर(टीडीआर) इतरत्र वापरण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव होता. परंतु तो व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो बारगळला.

या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्रफळ मिळावे आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्रफळ वजा जाता उर्वरित चटई क्षेत्रफळ टीडीआर स्वरूपात विकण्याची परवानगी देऊन बांधकामाचा खर्च निघावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. नव्या विकास आराखडय़ात त्याबद्दल उल्लेख केला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. नव्या विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद आणण्यास नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध केला. नव्या विकास नियंत्रण नियमावलीत हा परिसर ‘एअरपोर्ट फनेलबाधित’ म्हणून घोषित करावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, स्थानिक आमदार पराग अळवणी यांनी त्यावेळी प्रयत्न केले होते.

एअरपोर्ट फनेल’ म्हणजे काय?

सांताक्रूझ पूर्व-पश्चिम, विलेपार्ले पूर्व-पश्चिम, कुर्ला, घाटकोपर या उपनगरातील इमारतींना सांताक्रूझ आणि पवनहंस या विमानतळांचे फनेल झोन (विमानाचे उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गावरील परिसर) लागू आहेत. या फनेलमध्ये येणाऱ्या इमारतींच्या उंचीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम लागू आहेत. दोन ते तीन मजल्यांपर्यंतच उंचीची मर्यादा असल्यामुळे या इमारतींना लागू करण्यात आलेल्या एक चटई क्षेत्रफळात या इमारतींचा पुनर्विकास होणे अशक्य आहे. या इमारती जीर्ण झाल्या असून काही मोडकळीसही आल्या आहेत. स्वखर्चाने इमारतींचा पुनर्विकास करण्याची ऐपत नाही, अशा स्थितीत हे रहिवासी भरडले गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button