40 लेटलतिफांवर ‘रजा’ कारवाई

- मिळकतकर विभाग
- प्रभारी अधिकाऱ्यांची केली कारवाई
पुणे – तीन दिवस “लेटमार्क’ असणाऱ्या मिळकतकर विभागातील कर्मचाऱ्यांना एक दिवसाची रजा मांडण्याची कारवाई प्रभारी विभागप्रमुखांनी केली आहे. नियमावर बोट ठेवत अशाप्रकारची कारवाई केल्याने कर्मचाऱ्यांना वचक तर बसणार आहेच परंतु त्याची नोंद “सर्व्हिस बुक’मध्येही केली जाणार आहे.
विलास कानडे रजेवर असल्याने मिळकतकर विभाग प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर मोळक यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात “हा कर्मचारी अजून कामावर आला नाही,’ “तो कर्मचारी आला नाही.’ “अमुक-अमुकला यायला उशीर होतोय’ अशीच कारणे ऐकायला येत असल्याने थेट महिन्याभरातील लेटमार्कच मोळक यांनी काढायला सांगितले. त्यामध्ये विभागातील तब्बल 40 जण 3 दिवस आणि त्यापेक्षा जास्त वेळा उशिरा आल्याचे निष्पन्न झाले. महापालिका सर्व्हिस नियमाप्रमाणे तीन दिवस “लेटमार्क’ असेल तर त्याची एक दिवस रजा मांडणे आवश्यक आहे. याच नियमावर बोट ठेवून मोळक यांनी ही कारवाई केली.
“व्हिजीटला गेलो होतो’, “चहा प्यायला गेलो होतो’, “या अधिकाऱ्याकडे गेलो होतो’, अशी कारणे कर्मचारी देत असतात. नागरिक खोळंबलेले असतात, वारंवार ते चकरा मारतात परंतु कर्मचारीच जागेवर नसल्याने त्यांचे कामच होत नाही, असे चित्र महापालिकेत दिसते. त्यामुळे एकाच विभागात अशी कारवाई करून उपयोग नाही, तर सर्व विभागात असे करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मात्र, अशा कारवाईचा किती उपयोग कर्मचाऱ्यांच्या “अटेन्डन्स’वर होईल, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.