लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला ४ वर्षे सक्तमजुरी
नगर |
शहरातील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील भूकरमापक ज्योती दत्तात्रय डफळ ऊर्फ ज्योती संदीप नराळ यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ४ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने कैद अशी शिक्षा देण्यात आली. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी या खटल्याचा निकाल आज, मंगळवारी दिला. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी संध्या म्हस्के व लक्ष्मण काशीद यांनी साहाय्य केले.
तक्रारदार राजू वनाजी निमसे (खारे कर्जुने, नगर) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. भूमी अभिलेख कार्यालयात बाळा केरु निमसे यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे त्यांच्या जमिनीची मोजणी करायची होती. त्यामध्ये तक्रारदारांचे वडील व इतर चार चुलते असे पाच हिस्से होते. त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर लागली होती. पाच हिश्श्यांची मोजणी करून देण्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे एकूण १० हजार रुपये लाचेची मागणी भूकरमापक ज्योती डफळ यांनी केली होती. तक्रारीनुसार त्यांना विभागाचे पोलिस निरीक्षक श्याम पवरे यांनी सापळा रचून दि. २१ जुलै २०१७ रोजी अटक केली व दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.