धुळे-नंदुरबार जिल्हा बँक निवडणूकीसाठी १७ पैकी ४ जागा बिनविरोध
धुळे – बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १७ जागांसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून प्रयत्न सुरू आहेत. यात महाविकास आघाडी व भाजपातर्फे सर्वाधिकार माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांना बहाल झाले आहेत. त्यानंतर आता उमेदवारी अर्जाच्या छाननीतच १७ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये तीन उमेदवार शेतकरी पॅनेलचे, तर एक उमेदवार शिवसेनेचा आहे.
बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये शेतकरी पॅनेलचे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, शहादा येथून दीपक पाटील, तळोदा येथून भरत माळी आणि अक्कलकुवा येथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी या चौघांचा समावेश आहे. शिरपूर तालुका सोसायटी गटात राजधर पाटलांचा अर्ज बाद झाल्याने प्रभाकर चव्हाण हे बिनविरोध उमेदवार झाले. तर उर्वरित तिघांच्या विरोधात एकही उमेदवार उभा न राहिल्याने हे तिघेही बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, यंदा बँकेचे अध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्याला मिळावे, अशी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबारच्या काही नेत्यांची इच्छा आहे. ती किती फळास येते याकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच भाजपा आमदार अमरीश पटेल यांच्यासह काँग्रेस आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शरद पाटील आणि राष्ट्रवादीचे किरण पाटील हे उर्वरित जागाही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.