ताज्या घडामोडीमुंबई

मध्य रेल्वेवर ३६ जादा लोकल फेऱ्या; पाचव्या, सहाव्या मार्गिकेमुळे लाभ

मुंबई | ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वेवर ३६ नव्या लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मात्र, जादा भाडय़ामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असतानाही वाढीव फेऱ्यांमध्ये ३४ वातानुकूलित फेऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, दोनच विनावातानुकूलित सामान्य फेऱ्या आहेत़या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आह़े दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यावेळी वाढीव फेऱ्याही सेवेत दाखल होतील, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सीएसएमटी ते कल्याण मार्गावर सध्या १० वातानुकूलित लोकल फेऱ्या होतात. नव्या ३४ फेऱ्यांची भर पडणार असल्याने या मार्गावरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ४४ होईल. सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव हार्बरवर वातानुकूलित रेल्वेच्या ३२ फेऱ्या होतात. अल्प प्रतिसादामुळे त्यातील १६ फेऱ्या रद्द करून त्याऐवजी १६ विनावातानुकूलित फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बरवर फक्त वातानुकूलितच्या १६ फेऱ्याच प्रवाशांच्या सेवेत राहतील, अशी माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जानेवारी २०२० पासून सुरू झालेल्या ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल गाडीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. या मार्गावर दररोज १६ फेऱ्या होत होत्या. त्यातून साधारण ४० ते ६० प्रवासीच प्रवास करत होते. एका वातानुकूलित लोकल गाडीची एकूण प्रवासी क्षमता ५ हजार ९६४ आहे. यात १ हजार २८ प्रवासी आसनक्षमता व ४ हजार ९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. अल्प प्रतिसादामुळे ट्रान्स हार्बवरील वातानुकूलित लोकल सेवा ३ जानेवारी २०२२ पासून बंद करण्यात आली. आता अल्प प्रतिसादानंतर हार्बरवरील १६ फेऱ्या रद्द करून त्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यातच सध्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मार्गावर धावत असलेल्या वातानुकूलित लोकल फेऱ्यांना प्रतिसाद नसतानाही या मार्गावर वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्यात येत आहेत.

एकूण फेऱ्या १,८१०

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ३६ लोकल फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या १,७७४ वरून १,८१० होणार आहे.

भाडय़ाबाबत निर्णय नाहीच

मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेवर सेवेत असलेल्या वातानुकूलित लोकलचे भाडे जास्त असल्याने प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली. नुकत्याच झालेल्या वातानुकूलित लोकलच्या सर्वेक्षणातही भाडे कमी करण्याची सूचना ५२ टक्के प्रवाशांनी केली होती. त्यामुळे अर्धवातानुकूलित लोकलचाही पर्याय पुढे आला. परंतु, भाडे कमी करण्याबाबत निर्णय झालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button