breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कंत्राटी कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ; कॉंग्रेसच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी (महा ई न्यूज) –  देशभरातील सर्व क्षेत्रातील असंघटीत कामगारांना किमान वेतन मिळावे म्हणून देशभर पाठपुरावा करण्यात येत आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात नेमलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनदर लागू करण्याबाबत नुकतेच महापालिकेने आदेश जारी केले आहेत. कॉंग्रेसच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे त्यामुळे हजारो कंत्राटी कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदरू जम्मा यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सिद्धार्थ प्रभुणे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश कॉंग्रेसचे मागासवर्गीय विभाग उपाध्यक्ष गौतम आरकडे, समन्वयक रमेश व्यास, शीतल कोतवाल, इरफान शेख, मनोहर वाघमारे, सायरा शेख, तौफिक शेख, रमजान अत्तार, कलिंदर शेख, नवनाथ डेंगळे, संतोष रणसिंग आदी उपस्थित होते.

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले की, हिंजवडी कासारसाई येथील बलात्काराच्या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीस आणि गुरुवारी नेहरूनगर चौकात एच.ए. कंपनीच्या पटांगणावर अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. त्या मृत मुलींना शहर कॉंग्रेसच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच अशा घटना रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले असून त्याचा निषेध सचिन साठे यांनी या वेळी केला. प्रदेश सचिव सिद्धार्थ प्रभुणे यांनी नागपूर महापालिकेत याबाबत यशस्वी पाठपुरावा केला. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याबाबत आदेश काढला होता. त्या आदेशाची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनादेखील किमान वेतन मिळावे यासाठी सेलचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी मनपा प्रशासनाशी पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला. कॉंग्रेसच्या या लढ्याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशामुळेच यश आले आहे.

यापुढे असंघटीत कामगार काँग्रेस महाराष्ट्रभर याबाबत जनजागृती करणार आहे. या सरकारकडूनच कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणार आहे, व कामगारांना न्याय मिळवून देण्याकरता संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी दुपारी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. दुपारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी ढोल वाजवून व साखर वाटून आनंद साजरा केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button