breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

26/11 Attacks: ‘त्या’ एका सिम कार्डने केला ‘लष्कर-ए- तोयबा’चा पर्दाफाश

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात एक सिम कार्ड गुप्तचर यंत्रणांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. विशेष म्हणजे ते सिम कार्ड दहशतवादी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणांनीच एका एजंटमार्फत ‘लष्कर-ए- तोयबा’पर्यंत पोहोचवले होते. याच सिम कार्डचा वापर दहशतवादी हल्ल्यात झाला आणि गुप्तचर यंत्रणांना ठोस पुरावा हाती लागला.

गुप्तचर यंत्रणेतील माजी अधिकारी दिव्य प्रकाश सिन्हा यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. सिन्हा हे १९७९ आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई हल्ल्याविषयी ते सांगतात, २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास मला आयबीच्या संचालकांचा फोन आला. मुंबईत गोळीबार झाल्याचे त्यांनी मला सांगितले. मी त्यांच्याशी बोलत असतानाच मला आणखी एका सहकाऱ्याचा फोन आला. हा दहशतवादी हल्ला असावा, असे त्याने मला सांगितले. त्याने मला गुप्तचर यंत्रणेच्या नियंत्रण कक्षात काही कॉल्स ट्रेस झाले असून त्याचे रेकॉर्डिंग झाले आहे, अशी माहितीदेखील दिली. मी ही माहिती वरिष्ठांना दिली आणि तातडीने नियंत्रण कक्ष गाठले, असे त्यांनी सांगितले.

जे मोबाईल क्रमांक गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर असतात त्याची सविस्तर माहिती कार्यालयात उपलब्ध असते. मोबाईल नंबरवर लक्ष ठेवण्याचे आदेश कोणत्या अधिकाऱ्याने दिले, कोणत्या यंत्रणेने ही सूचना केली होती, याची नोंद केली जाते. याचा दाखला देत सिन्हा पुढे म्हणाले, मी देखील मोबाईल नंबरबाबत चौकशी केली. या नंबरवर लक्ष ठेवण्याचे आदेश कोणी दिले, असा प्रश्न मी उपस्थितांना विचारला. यावर एका अधिकाऱ्याने तुम्हीच हे आदेश दिले होते, असे मला सांगितले आणि मग मला संपूर्ण घटनाक्रम आठवला, असे ते सांगतात.

“आम्ही दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी काही सिम कार्ड्स त्यांना पुरवण्याचा सापळा रचला होता. एका एजंटमार्फत हे सिम कार्ड दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचवले जाणार होते. ‘लष्कर- ए- तोयबा’ला ३० सिम कार्ड्स पुरवण्यात आले. यातील कोणतेही सिम कार्ड दहशतवाद्यांनी अॅक्टीव्ह केले तर ते लगेच गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर येतील आणि गुप्तचर यंत्रणांना ठोस माहिती उपलब्ध होईल, असा आमचा प्लॅन होता”, असे सिन्हा यांनी नमूद केले.

गुप्तचर यंत्रणेच्या श्रीनगर विभागाचे तत्कालीन प्रमुख अरुण चौधरी यांनी देखील सिम कार्ड ट्रॅपबाबत माहिती दिली. सिन्हा आणि जम्मू- काश्मीरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी एस एम सहाय यांनी हा प्लॅन आखला होता. यातील तीन सिम कार्ड्स देशाच्या अन्य शहरांमधून घेण्यात आले होते. यातील एका सिम कार्डचा वापर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात झाला’, असे चौधरी यांनी सांगितले.

‘ताजमध्ये गेलेल्या दहशतवाद्यांकडे एक सिम कार्ड होता. या सिम कार्डवर अमेरिकी व्हर्च्यूअल नंबरवर फोन येत होता. यावरुन कराचीतूनच या हल्ल्याचे नियोजन केल्याचे स्पष्ट झाले, असे गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी सांगतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button