कापूस-तुरीच्या शेतात गांजाची शेती; पोलिसांची मोठी कारवाई, 82.50 लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूरच्या अतिदुर्गम भागात छापा; 330 किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त, एक संशयित ताब्यात तर दुसरा फरार

धुळे : शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर गांजा शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याचे कारवाईत समोर आले. पोलिसांनी छापा टाकून तब्बल 330 किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत 82 लाख 50 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिरपूर तालुक्यातील चिलारे, पोस्ट सुळे परिसरातील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर गांजाची लागवड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित शिलदार पावरा आणि दीपक पावरा यांनी कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये कॅनाबिस वनस्पती अर्थात गांजाची लागवड केली होती. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.
हेही वाचा – चौथ्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईला मोठा धक्का; वर्ल्डवाइड कलेक्शन 250 कोटींच्या पार
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून सुमारे 330 किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याची किंमत 25 हजार रुपये प्रति किलो या दराने सुमारे 82 लाख 50 हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी 42 वर्षीय दीपक पावरा याला ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांची चाहूल लागताच दुसरा संशयित शिलदार पावरा घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या बेकायदेशीर गांजा शेतीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अमली पदार्थाची पुढे विक्री किंवा वाहतूक केली जात होती का, याचा तपास केला जात आहे.





