अकोल्यात खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा दणका; ११.८२ लाखांचा तेलसाठा जप्त
भेसळीचा संशय आणि नियमांचे उल्लंघन; दोन पेढ्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित

अकोला : शहरातील एमआयडीसी परिसरात खाद्यतेलाच्या दोन पेढ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. खाद्यतेलात भेसळीचा संशय, सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री तसेच साठवणूक आणि प्रयोगशाळेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने दोन्ही पेढ्यांमधील ११ लाख ८२ हजार ६५० रुपयांचा तेलसाठा जप्त केला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही पेढ्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण पेढी येथे रिफाइंड सोयाबीन ऑईल ‘शक्ती’चा नमुना घेण्यात आला. तपासणीदरम्यान तेलामध्ये भेसळीचा संशय आढळून आला. याशिवाय सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री होत असल्याचेही निदर्शनास आले.
पेढीकडे आवश्यक प्रयोगशाळा नसणे, प्रयोगशाळेचे अहवाल उपलब्ध नसणे आणि repacker चा परवाना असतानाही ट्रेडिंगचा व्यवसाय केला जात असल्याचे तपासणीत आढळले.
हेही वाचा – लिपिक भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग टेस्ट रद्द
६.२१ लाखांचा तेलसाठा जप्त
या कारवाईत प्रशासनाने ३,४२८ किलो ४०० ग्रॅम खाद्यतेलाचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ६ लाख २१ हजार ३०० रुपये आहे. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दुसऱ्या पेढीतही गंभीर त्रुटी
दरम्यान, भारतकुमार अँड ब्रदर्स या पेढीवरही अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली. येथे रिफाइंड सोयाबीन ऑईल (लूज)चा नमुना घेण्यात आला. तपासणीदरम्यान भेसळीचा संशय, अद्ययावत प्रयोगशाळेचा अभाव, सुट्ट्या तेलाची विक्री तसेच आवश्यक प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळून आले.
या पेढीतून ३,५९८ किलो ४०० ग्रॅम तेलसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ५ लाख ६१ हजार ३५० रुपये आहे. अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी ही कारवाई केली.
दोन्ही पेढ्यांकडे repacker oil चा परवाना असतानाही तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळून आल्याने प्रशासनाने त्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहेत. या कारवाईमुळे खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.





