CNG पुन्हा महागला; चार महिन्यांत तब्बल 10 रुपयांची वाढ, महाराष्ट्रातही दरवाढीची शक्यता
दिल्ली-NCRमध्ये CNGच्या दरात थेट 3.89 रुपयांची वाढ; आंतरराष्ट्रीय बाजारातील LNG दरवाढीचा परिणाम

नवी दिल्ली : इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे जागतिक इंधन बाजारावर अद्याप दबाव कायम आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्याचा परिणाम आता थेट CNGच्या दरांवर होत आहे. दिल्ली-NCRमध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) CNGच्या दरात 3 रुपये 89 पैसे प्रति किलो वाढ केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत CNGचा दर आता 86 रुपये 98 पैसे प्रति किलो झाला आहे.
गेल्या चार महिन्यांचा विचार केला तर दिल्ली-NCRमध्ये CNGच्या दरात जवळपास 10 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील CNGच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता महाराष्ट्रातही आगामी काळात CNG महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीत CNG 86.98 रुपये किलो
IGLने केलेल्या नव्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये CNGचा दर 86.98 रुपये प्रति किलो झाला आहे. नोएडा आणि गाझियाबादमध्ये 95.59 रुपये, गुरुग्राममध्ये 92.01 रुपये, तर मेरठमध्ये 95.47 रुपये प्रति किलो असा CNGचा नवा दर झाला आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू असलेल्या VATच्या दरात फरक असल्याने प्रत्येक शहरातील CNGच्या किमतीत तफावत दिसून येते.
चार महिन्यांत जवळपास 10 रुपयांची दरवाढ
CNGच्या दरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ झाली आहे. 15 मे रोजी IGLने CNGच्या दरात 2 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 17 मे, 23 मे आणि 26 मे रोजी टप्प्याटप्प्याने दरवाढ करण्यात आली. 17 ते 26 मे या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत CNG सुमारे 6 रुपयांनी महागला होता.
आता 29 ऑगस्ट रोजी पुन्हा 3.89 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधीत दिल्ली-NCRमधील CNGच्या दरात एकूण 9.89 रुपयांची वाढ झाली आहे.
हेही वाचा – नेपाळमध्ये पुरानंतर दोन धोकादायक तलाव; आणखी पूर-भूस्खलनाचा धोका कायम
LNGच्या वाढत्या किमतींचा परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात LNGच्या किमतीत झालेली मोठी वाढ CNG दरवाढीमागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जुलैपासून जागतिक स्तरावर LNGच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत.
आशियातील JKM LNG बेंचमार्कनुसार, यंदा फेब्रुवारीमध्ये LNGचा दर सुमारे 11 डॉलर प्रति MMBtu होता. ऑगस्टमध्ये तो वाढून 23.4 डॉलर झाला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम LNGच्या पुरवठ्यावर आणि किमतीवर झाला आहे.
महाराष्ट्रात CNG कधी महागणार?
सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील CNGच्या दरात वाढ झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जागतिक बाजारातील LNGच्या वाढत्या किमती आणि इंधन पुरवठ्यावर निर्माण झालेला दबाव लक्षात घेता महाराष्ट्रातील ग्राहकांनाही आगामी काळात दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
CNGचा वापर करणाऱ्या वाहनचालकांसाठी सलग झालेल्या दरवाढीमुळे प्रवासाचा खर्च वाढण्याची शक्यता असून, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मालवाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीच्या खर्चावरही होऊ शकतो.





