सामाजिक उद्रेक। ताथवडेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी सर्वधर्मीय निषेध रॅली!
सामाजिक संघटना सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांसह महिलांचा सहभाग लक्षनीय

वाकड | ताथवडे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आणि पीडितांना न्याय मिळावा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २९) सायंकाळी शांततापूर्ण निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध सामाजिक संघटना सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांसह महिलांचा सहभाग लक्षनीय होता. ताथवडे गावठाणातून सुरू झालेल्या या मोर्चाची डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सांगता झाली.
या प्रकरणात आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितांना लवकर न्याय मिळावा अशी मागणी करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ताथवडे येथील नृसिंह चौकातून रॅलीला सुरूवात झाली. हातात विविध आशयचे फलक घेतलेल्या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅली येताच अनेकांनी भाषणातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला. त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
यावेळी आमदार शंकर जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर, नगरसेविका रेश्मा भुजबळ, श्रुती वाकडकर, स्नेहा कलाटे, राम वाकडकर, चेतन भुजबळ, सुप्रिया पवार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत नवले, अजित पवार, साकी गायकवाड, रवि भिलारे, सिद्धेश सोनकवडे, विकास जाधव, योगेश पवार, रितू कांबळे यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ताथवडे नाराज मोर्चेकरांचा मोर्चा पोलिस ठाण्याकडे…!
शिवाजी महाराज पुतळ्यासमोर काही नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी भाषणे करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली. मात्र आम्हाला भाषण करण्याची संधी दिलीच नाही असा आरोप करत शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, घोषणाबाजी करत वाकड पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळवीला. तिथे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे यातील महिलांच्या शिष्टमंडळाने चर्चा करत आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली.





