Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

२०२१ हे सर्वाधिक उष्ण वर्ष नव्हे; जागतिक हवामान संघटनेने केलेले भाकित चिंता वाढवणारे

मुंबईः गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक उष्ण वर्षाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होत असताना २०२१ हे सर्वाधिक उष्ण वर्ष नव्हते, असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. मात्र जागतिक हवामान बदलाच्या निदर्शकांपैकी हरितवायूंचे प्रमाण, समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, समुद्राच्या पाण्याची उष्णता आणि समुद्राच्या पाण्याचे आम्लीकरण या घटकांची पातळी वाढलेली होती. या घटकांनी नवा उच्चांक नोंदवला आहे. जागतिक हवामान संघटनेने प्रसिद्ध केलेल्या २०२१च्या जागतिक हवामान अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पुढील पाच वर्षे सर्वाधिक उष्म्याची असतील असेही या अहवालात म्हटले आहे.

हरितगृह वायूंचे प्रमाण २०२०मध्ये सर्वाधिक होते. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण हे औद्योगिक क्रांतीपूर्व काळापेक्षा १४९ टक्क्यांनी अधिक होते. काही ठरावीक ठिकाणांच्या उपलब्ध माहितीनुसार हे प्रमाण २०२१ आणि २०२२च्या सुरुवातीच्या काळात सातत्याने वाढलेले दिसले. हवाईमधील मौनालोआ इथे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण एप्रिल २०२०मध्ये ४१६.४५ मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी (पीपीएम) असे होते, ते एप्रिल २०२१ मध्ये ४१९.०५ तर एप्रिल २०२२ मध्ये ४२०.२३ पीपीएम नोंदवले गेले. समुद्राची उष्णताही सर्वाधिक नोंदली गेली. समुद्राच्या वरच्या थरातील २०० मीटरपर्यंतचे पाणी २०२१ मध्ये उष्ण होते. हे पाणी येत्या काळातही असेच उष्ण असेल असे अनुमान आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये समुद्राच्या पाण्याची उष्णता सातत्याने वाढत असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसत आहे. समुद्रामध्ये मानवी कृत्यांमुळे निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साइडपैकी २३ टक्के कार्बन डायऑक्साइड शोषला जातो. परिणामी समुद्राचे पाणी आम्लयुक्त होते. यामुळे सागरी जैवविविधतेला धोका निर्माण होता. समुद्राच्या पाण्याची पीएच पातळी यामुळे कमी होते. आयपीसीसीच्या अहवालानुसार समुद्राच्या पृष्ठभागावरील पीएच पातळी ही गेल्या २६ हजार वर्षांमधील सर्वांत खालावलेली होती. हा स्तर अधिक खाली घसरत असल्याचेही जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. बर्फ वितळण्याचा वेग वाढल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून किनाऱ्यांवरील नागरिकांसाठी हा मोठा धोका आहे. तसेच, यामुळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळेही वाढण्याची शक्यता आहे.

परिसंस्थेवर दीर्घकालीन घातक परिणाम

मानवी हस्तक्षेपामुळे जमीन, समुद्र, वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे शाश्वत विकास, परिसंस्था यावर घातक आणि दीर्घकालीन परिणाम होत आहेत. २०२१च्या जागतिक हवामान अहवालामध्ये गेली सात वर्षे विक्रमी उष्णतेची होती हे स्पष्ट झाल्यानंतर २०२१ हे ला निना सक्रीय असल्याने उष्णतेचा नवा उच्चांक नोंदवणारे ठरले नाही. यामुळे केवळ तात्पुरत्या स्वरूपात उष्णता कमी करण्यासाठी मदत झाली. तरीही २०२१ हे वर्ष औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळापेक्षा १.११ अंश सेल्सिअसने अधिक उष्ण नोंदले गेले याकडे जागतिक हवामान संघटनेने लक्ष वेधले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button