20 वर्षांची महिला 25 आठवड्याच्या गर्भपातासाठी हायकोर्टात

मुंबई – रायगड जिल्ह्यातील 20 वर्षांच्या महिलेने 25 आठवड्याचा गर्भपात करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेची उच्च न्यायालयाचे सुटीकाली न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेऊन जे. जे. रुगणालयाच्या तज्ञं डॉक्टरांच्या कमिटीने या महिलेची तातडीने वैद्यकिय तपासणी करून 2 जूनपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी 4 जून रोजी निश्चित केली आहे.
23 आठवड्याची गर्भवती असलेल्या या महिलेने सोनोग्राफी अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. व्याधीग्रस्त गर्भ आणि त्यामुळे स्वत:च्या जिवीताला संभावत असलेला धोका याकडे लक्ष वेधत गर्भपातासाठी परवानगी देण्याची विनंती एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली. गर्भामध्ये गंभीर स्वरुपाच्या व्याधी असल्याचा अहवाल असला तरी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नसी ऍक्टच्या कलम 5 अन्वये 28 आठवड्याच्या महिलेला गर्भपातास परवानगी देण्याबाबत जे. जे. रुगणालयाच्या तज्ञ डॉक्टरांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
या कमिटीच्या अहवालानंतर न्यायालयाकडून परवानगी दिली जाते. त्यानुसार न्यायालयाने चार दिवसांत या महिलेची जे.जे. रुगणालयात वैद्यकिय तपासणी करून 2 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देताना याचिकेची सुनावणी 4 जून रोजी निश्चित केली आहे.