breaking-newsताज्या घडामोडीपुणे

19 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे – ‘पुणे चित्रपट महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकली आहे. यापुढेही हे काम अविरतपणे सुरु राहावे यासाठी महोत्सवाला कायमस्वरूपी वास्तू असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे महापालिका सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे.’ 19 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन मंगळवारी (दि.02) महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘पिफ डिस्टिंग्विश अवार्ड’ प्रदान करण्यात आला. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल, फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू डॉ. मंगेश कराड, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, कॅनडाचे कॉन्सुल जनरल मायकल वोंक आदी उद्धघाटन संमारंभाला उपस्थित होते.

मोहोळ पुढे म्हणाले, ‘जगभरात अनेक व्यवस्थांवर कोविड काळात ताण आला. मनाला वेदना देणारी ही परिस्थिती होती. मात्र महोत्सवाच्या वतीने या काळात काम केलेल्या योध्यांचा गौरव करण्यात येत आहे, हे अतिशय मोठे काम आहे. या काळात पुणे महापालिकेचे 85 लोक मृत्युमुखी पडले. त्यांचेही स्मरण करणे गरजेचे आहे.’

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सतीश मुंद्रा यांचा कोविड काळात केलेल्या कामाबद्दल महापौर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अमिताभ गुप्ता म्हणाले, ‘सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य केले. सर्वांनी एकत्र काम केले म्हणून आपण सगळ्यांनी या महासाथीच्या काळात यशस्वीपणे पुढे गेलो.’

डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट महोत्सवाची माहिती दिली. पटेल म्हणाले, कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या ज्या कोरोना योद्ध्यांनी काम केले हा महोत्सव त्यांना समर्पित आहे. महोत्सवादरम्यान जगभरातील 127 चित्रपट दाखविले जाणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा यावेळी चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पिफ डिस्टिंग्विश अवार्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, ‘कलाकार काम करत असतात, पण त्याची कदर करणारी माणसे असावी लागतात. आज मला माझी नोंद घेतल्याचे समाधान आहे. या पुरस्काराने मला अनेक दिग्गजांच्या यादीत नेऊन बसविले. पिफने माझा हा सन्मान केला त्याबद्दल मी ऋणी आहे. रसिकांनी मला जे प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो.’ चित्रपट महोत्सव निवड समितीचे प्रमुख समर नखाते यांनी आभार मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button