TOP Newsताज्या घडामोडीपुणे

दुर्मीळ मेंदुविकाराने ग्रासलेली १९ वर्षीय तरुणी शस्त्रक्रियेद्वारे अपस्मारमुक्त

वयाच्या सहाव्या वर्षापासून अपस्माराच्या (एपिलेप्सी) झटक्यांनी ग्रासलेल्या १९ वर्षीय तरुणीला शस्त्रक्रियेनंतर अपस्मार मुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या आजारामुळे तिला दररोज दोन वेळा अपस्माराचा झटका (फीट) येत असे. अनेक औषधांनंतरही तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नव्हती.

मेंदूच्या डाव्या बाजूच्या टेम्पोरल भागातील फोकल कॉर्टिकल डिस्प्लेशियामुळे या १९ वर्षीय मुलीला अपस्माराने ग्रासले होते. बाणेर येथील मणिपाल रुग्णालयातील डॉ. नंदन यार्दी यांच्याकडे ती उपचारांसाठी आली असता तिच्या सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये तिच्या डाव्या टेम्पोरल लोबमध्ये फोकल कॉर्टिकल डिस्प्लेशिया असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिला काही वेळा बोलणे शक्य होत नसे, वाचेवरील नियंत्रण जात असे आणि हाताच्या विचित्र हालचाली होत असत. डॉ. यार्दी यांनी मेंदुशल्यविशारद डॉ. अमित धाकोजी यांच्याबरोबर सल्लामसलत करून झटक्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या तसेच रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने अपस्माराची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
फोकल कॉर्टिकल डिस्प्लेशियामधून अपस्मार होण्याची शक्यता असते. या प्रकारातील अपस्मार सहसा अनियंत्रित असण्याची जोखीम असते. याचा परिणाम मेंदूच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. सर्वसाधारणपणे हा आजार लहान मुले आणि तरुणांमध्ये आढळतो.

डॉ. अमित धाकोजी म्हणाले, की तिची प्रकृती आणखी गुंतागुंतीची होण्याच्या आत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तिनेही शस्त्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिला. शस्त्रक्रियेनंतरच्या काही अडचणींवर मात करण्यासाठी तिला वाचा उपचार (स्पीच थेरपी) देण्यात आले. अपस्माराच्या काही प्रकारांमध्ये आम्ही तपशीलवार शस्त्रक्रियापूर्व तपासणी करून अपस्माराचा केंद्रबिंदू शोधून ते केंद्र काढून टाकता येते. त्यामुळे रुग्णाला येणारे अपस्माराचे झटके बंद होतात आणि रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगतात. डॉ. अमित धाकोजी, श्रेय कुमार शहा, डॉ. नंदन यार्दी, डॉ. मुदस्सर आणि डॉ. श्रुती वडके यांचा शस्त्रक्रिया आणि उपचारांच्या संघात समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button