TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे शहरातील १९ ठिकाणे ‘जीवघेणी’

शहरातील १९ ठिकाणे जीवघेणी असून नगर रस्ता, कात्रज, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग, हडपसर भागात सर्वाधिक अपघात घडले आहेत. नोव्हेंबर महिना अखेरीपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात २९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढते आहे.

शहरातील १९ भागात अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) आहेत. या भागात सातत्याने अपघात घडतात. या भागातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक विषयक सुधारणा करण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक विषयक उपाययोजना तसेच सुधारणा करण्याबाबत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात गेल्या आठवडाभरात गंभीर स्वरूपाचे नऊ अपघात झाले आहेत. या भागातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दीर्घकालीन कृती आरखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

हडपसर-सासवड रस्ता, शिवाजीनगर भागातील संचेती चौक, वारजे भागातील माई मंगेशकर रुग्णालय, वारजे भागातील मुठा नदीपूल, डुक्करखिंड, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौक, येरवडा भागातील संगमवाडी पार्किंग, मुंढव्यातील रेल्वे पूल, सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौक, नवले पूल, नगर रस्त्यावरील टाटा गार्डन चौक, वाघोली, लोहगाव भागातील ५०९ चौक, नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका, कात्रज चौक, बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा, दरी पूल परिसरात अपघात होतात.

सर्वाधिक अपघातांची ठिकाणे, अपघात, मृत्यू
लोणीकाळभोर ४३ ४६
(सोलापूर रस्ता)
लोणीकंद ३१ ३१

(वाघोली, नगर रस्ता)
हडपसर २७ २९
भारती विद्यापीठ २४ २५
सिंहगड रस्ता ११ १२
वारजे १२ १२
चतु:शृंगी ११ ११
येरवडा १४ १५
विमानतळ १९ १९
वानवडी १२ १४
कोंढवा १७ १८
हांडेवाडी ८ ८
(आकडेवारी नाेव्हेंबर अखेरीपर्यंत)

सोलापूर रस्ता, नगर रस्ता धोकादायक
पुणे-सोलापूर रस्ता, पुणे-नगर रस्त्यावर गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. सोलापूर रस्त्यावरील यंदा नोव्हेंबर महिना अखेरीपर्यंत ४३ अपघात झाले आहे. सोलापूर रस्त्यावरील अपघातात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. नगर रस्त्यावरील वाघोली, लोणीकंद परिसरात ३१ अपघात घडले असून नगर रस्त्यावरील अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज भाग, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. पुणे शहरालगत असलेल्या लोणीकंद, लोणी काळाभोर भागात समावेश पुुणे पोलीस आयुक्तालयात करण्यात आला असून सोलापूर, नगर रस्त्यावर अवजड वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे.

शहरातील अपघात
वर्ष अपघात मृत्यू
२०२० १३५ १४३
२०२१ २३९ २५५
२०२२ २८२ २९३
(२०२२ ची आकडेवारी नाेव्हेंबर अखेरीपर्यंतची)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button