breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागपूरच्या ठेकेदारासाठी महापालिका प्रशासनाच्या पायघड्या!

–       निविदा अटी-शर्तींमध्ये बदलसाठी ‘दिल्ली कनेक्शन’ चा वापर?

–   महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या संशयास्पद हालचाली

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

नागपुरमधील ठेकेदार संस्थेला पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागातील काम ‘सेट’ करण्यासाठी थेट केंद्रीय मंत्रीमंडळातील मोठा नेता आणि शहरातील भाजपा आमदारांनी दबाव निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती आणि तांत्रिक बाबींशी तडजोड करुन पिंपरी-चिंचवडकरांच्या माथी ‘वॉटर ट्रिटमेंट प्लॅन्ट’ मारला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून निगडी येथील वॉटर ट्रिटमेंट प्लॅन्ट उभारला आहे. त्या प्रकल्पाची क्षमता १०० एमएलडीने वाढवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी प्रशासनाने सल्लागार म्हणून ‘डीआरए’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेत भाजपाच्या एका आमदारांशी सलोखा असलेली ठेकेदार कंपनीने सहभाग घेतला आहे.

सल्लागार संस्था आणि निविदा प्रक्रियेत सहभागी झालेली एक ठेकेदार संस्था दोघेही नागपूरशी संबंधित आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेला काम मिळावे. याकरिता प्रशासनावर दबाव निर्माण केला जात आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

*

‘२४ बाय ७’ पाणी  योजनेतही हलगर्जीपणा..?

भाजपा नेत्याशी सलोखा असलेल्या संबंधित ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेतील काम दिले होते. दोन वर्षे मुदत असलेले काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सुमारे साडेचार वर्षांचा कालावधी लागला. या ठेकेदार संस्थेला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याबाबत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. पण, शहरातील आणि  केंद्रातील बड्या नेत्यांच्या मध्यस्थीने संबंधित ठेकेदाराला ‘रेड कार्पेट’ देण्यात आले.

**

निविदा प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचनांशी तडजोड

केंद्र सरकारने निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र, महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती आणि मार्गदर्शक सूचनांमध्ये तडजोड करावी, असा दबाव निविदा पूर्व बैठकीत निर्माण करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या निविदा पूर्व बैठकीनंतर अद्याप प्रशासनाने या निविदा प्रक्रियेबाबत काहीही हालचाली केलेल्या दिसत नाहीत.

**

रामदास तांबे, प्रवीण लडकत यांची भूमिका संशयास्पद

पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी रामदास तांबे आणि प्रवीण लडकत यांनी २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेतील कामामध्ये संबंधित नागपूरस्थित ठेकेदार संस्थेला पाठीशी घातले आहे. त्याच संस्थेला आता पुन्हा निविदा अटी-शर्तींमध्ये तडजोड करुन काम देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. ‘सीव्हीसी’ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार निविदा प्रक्रिया राबववी, अशी माफक अपेक्षा आहे. मात्र, प्रशासन विशिष्ट ठेकेदाराला समोर ठेवून निविदा प्रक्रिया राबवीत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button