भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी 11 जानेवारीला कन्यारत्न जन्माला आले. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ असल्यामुळे आपल्या मुलीचा फोटो मीडियात येऊ नये, अशी विरुष्काची इच्छा आहे. याबाबत त्यांनी मीडियाला निवेदन देत सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
“या वर्षात तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप धन्यवाद, आपल्यासोबत हा खास क्षण सेलिब्रेट करुन आम्हाला आनंद होत आहे. पालक म्हणून आमची एक छोटीशी विनंती आहे. आम्ही आमच्या बाळाची प्रायव्हसी सुरक्षित ठेवू इच्छितो. यासाठी आम्हाला आपल्या मदत आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे”, असं निवेदनात म्हटलं आहे.
“आम्ही नेहमी या गोष्टीकडे लक्ष देतो की, आमच्याकडून तुम्हाला मिळणारा जो कंटेंट आहे तो मिळत राहावा. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, असा कोणताही कंटेट नसावा ज्यात आमच्या मुलीचा फोटो असेल. आम्हाला माहित आहे की, तुम्ही समजू शकतात आणि याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत”, असं विराट आणि अनुष्काने निवेदनात म्हटलं आहे