भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुली पुन्हा एकदा नवीन इंनिंग खेळण्यास सज्ज झाला असल्याचे चिन्ह दिसत आहे. आधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्मधार, पुढे बीसीसीआयचा अध्यक्ष आणि आता राजकारण. होय, सौरव गांगुली हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यातच आता सौरव गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहे. भाजपकडून येथे पुर्ण जोर लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून सौरव गांगुलीला प्रमूख चेहरा केले जाऊ शकते. मात्र यावर आतापर्यंत गांगुलीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
वाचाः खासदार उदयनराजे-रामराजे नाईक निंबाळकर एकमेकांसमोर येतात तेव्हा…
गांगुलीने राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडून वारंवार बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता दौऱ्यावर असताना बंगालचा भूमिपुत्रच बंगालचा मुख्यमंत्री होईल, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे बंगालचा भूमिपुत्र सौरभ गांगुलीच आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आता भाजप ममता बॅनर्जींच्या विरोधात पश्चिम बंगालचं मैदान सौरव गांगुली गाजवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.