17 अफगाण सैनिकांना मारून तालिबानची युद्धबंदीची घोषणा

काबुल (अफगाणिस्तान) -तालिबानने अफगाणिस्तानात तीन दिवसांची युद्धबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अफगाण नागरिकंना रमजानचा पवित्र महिना अचानक हल्ल्यातील मृत्यूच्या भीतीविना घालवता येणार आहे. मात्र युद्धविरामाची घोषणा करण्यापूर्वी काही तास अगोदर तलिबानने पश्चिम अफगाणिस्तानातील एक लष्करी छावणीवर हल्ला करून 17 सैनिकांना ठार केले आणि अनेकांना जखमी केले. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतल्याची महिती हेरात प्रांताच्या राज्यपालांच्या प्रवक्त्याने दिली आहे.
तालिबानने तीन दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वी अफगाण सरकारने मुस्लिमांच्या पवित्र रमजाननिमित्त 12 जून ते 19 जून अशी आठ दिवसांची युद्धबंदी जाहीर केली होती. तालिबानने तीन दिवसांची युद्धबंदी जाहीर केली असली, तरी ही युद्धबंदी केवळ अफगाण लष्कराबाबत लागू असणार आहे. परदेशी लष्करविरुद्ध त्यांचे अभियान चालूच राहणार असण्याचा खुलासा केला आहे, अफगाणिस्तान सरकारने जाहीर केलेल्या आठ दिवसांच्या युद्धबंदीला तालिबानने सकारात्म्क प्रतिसाद द्यावा असे आवाहन रशियाने केले होते. नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) चे महासचिव जेम्स स्टोलटेनबर्ग यांनी आणि व्हाईट हाऊसनेही तालिबानला हिंसेचा मार्ग सोडून अफगान सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत तालिबानने 3 दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे.