breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

रौद्रधारांचे १६ बळी ; मराठवाडा, विदर्भात दाणादाण; मुंबई, ठाण्यालाही तडाखा

औरंगाबाद-नागपूर-मुंबई-ठाणे |

पावसाने रौद्ररूप धारण करत मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य़ांबरोबरच मुंबई, ठाणे परिसराला झोडपले. अतिवृष्टीमुळे मराठवाडय़ात दहा, विदर्भात पाच आणि नाशिकमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, मुंबई परिसरात मुसळधार पावसाने खड्डेमय रस्त्यांवरून घरपरतीचा नोकरदारांचा मार्ग बिकट केला. ‘गुलाब’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत जाणवला. मराठवाडय़ात सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर धरणे तुडुंब भरली. काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले.

अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम हातचा गेल्याचे चित्र होते. मराठवाडय़ात २०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ‘एनडीआरएफ’ने पुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुटका केली. विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस झाला. या जिल्ह्य़ांमधील काही धरणांची दारे उघडण्यात आली असून, काही ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यवतमाळमध्ये उमरखेड-पुसद मार्गावर दहागाव नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्यातून बस पुढे नेण्याचा प्रयत्न चालकासह चार जणांच्या जीवावर बेतला. चालक आणि वाहकासह चार जणांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यातील कदमापूर येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणातील इतर भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढत गेला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे ११७.८ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई महानगरपालिकेच्या नोंदीनुसार सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत पश्चिम उपनगरात ६७.९८ मिमी, पूर्व उपनगरात ७५.८४, शहर भागात ७०.५९ मिमी पाऊस झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास कु र्ला एलबीएस रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे काही बस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. हा मार्ग पूर्ववत होण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

  • खड्डेभरणा मोहिमेवर पाणी; पुन्हा वाहतूक कोंडी

ठाणे : ठाण्यात खड्डेभरणा मोहीम युद्धपातळीवर सुरू असताना बुजवलेले खड्डे पावसामुळे पुन्हा उखडले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. मुंबई- नाशिक महामार्गावरील साकेत पूल ते नितीन कंपनी आणि भिवंडीतील टाटा आमंत्रापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दहा-पंधरा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे दोन तास लागत होते. भिवंडीतील कशेळी ते राहनाळपर्यंत त्याचबरोबर, कळवा विटावा भागात विटावा ते कळवा पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

  • आजही मुसळधारांचा अंदाज

पुणे : ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव ४८ तास कायम राहणार असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टीचा अंदाज असून विदर्भ, उत्तर कोकणातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button