breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

१४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदेंचं आश्वासन

मुंबई |

भांडर्ली तसंच आसपासच्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्याबाबत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आहे.

१४ गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत. शहरीकरण झपाटय़ाने वाढत असल्याने हा विकास गावांतही व्हावा म्हणून अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही गावे महापालिकेतून वगळली होती. आता पुन्हा ती समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आधी गावे वगळा यासाठी हिंसक झालेले ग्रामस्थ आज इतक्या वर्षांनी महापालिका हवी अशी मागणी करू लागले आहेत.

  • एकनाथ शिंदे काय म्हणाले –

“नवी मुंबई महापालिकेत या १४ गावांचा समावेश करावा अशी मागणी होती. नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मी दिलं आहे. कायदेशीर आणि तांत्रिक बाबी तपासून तो निर्णय घेतला जाईल. सर्व १४ गावांचा विकास महत्वाचा आहे. पालिकेच्या, राज्य सरकारच्या, नगरविकासाच्या माध्यमातून लोकांना मुलभूत सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

ही १४ गावे सुरुवातीला नवी मुंबई महापालिकेत होती. वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर ती वगळावीत यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. हा वाद इतका टोकाला गेला होता की गावातून निवडणूक अर्ज दाखल करणाऱ्या दोघा उमेदवारांची घरे जाळण्यात आली होती. अखेर तत्कालीन काँग्रेस सरकारने ती गावे वगळली. या काळात कोणतेही ठोस नियोजन प्राधिकरण नसल्याने गावांचा विचका झाला. तळोजा, कल्याण, शिळ रस्त्यावर प्रचंड गोडामे उभी राहिली. आता ग्रामस्थ पुन्हा गावे महापालिकेत घ्या अशी मागणी करत आहेत.

  • “ग्रामस्थांनी स्वतःच्या हाताने गावांचा विचका केला”

महापालिका नको म्हणत या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत स्वीकारली. या गावात जागोजागी बेकायदा बांधकामं उभी राहिली आहेत. शीळ तळोजा मार्गावर असलेली बेकायदा गोदामही या गावाचं देणं आहे. मोठे भंगार माफिया या रस्त्यावर खेटून व्यवसाय करतात. त्याकडे लक्ष द्यायची ग्रामपंचायतीची कुवत नव्हती आणि दुसरीकडे जिल्हा प्रशासन, पोलिसांनी डोळेझाक केली. महापालिका त्यावर वरचेवर कारवाई करत होती. गावातील मोकळ्या गुरचरण जमिनीवर आरक्षण पडेल अशी भीती गावातील एका मोठ्या गटाला होती. शिवाय भंगार गोदाम मालक आणि जमीन मालकी असलेलं ग्रामस्थ, त्यांचे पुढारी अशी मोठी साखळी महापालिका नको यासाठी आग्रही राहिली. ग्रामस्थ नेत्याच्या बोलण्यात आले, हिंसक झाले. आणि याचमुळे पुढे गावांचा विचका झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button