breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona: ‘लॉकडाऊन’मध्ये काय चुकले?…चुकांच्या दुरुस्तीशिवाय युद्ध जिंकणे अशक्य : सामाजिक कार्यकर्ते सारंग कामतेकर

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

अपेक्षेप्रमाणे २१ दिवसांचे लॉकडाऊन पुन्हा ३ मे पर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कोरोना विषाणुमुळे संपूर्ण देश एकूण ४० दिवस ठप्प राहणार. लॉकडाऊन वाढीची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन : २ मध्ये नियमांची अधिक कडक अंमलबजावणी करण्याचे सुतोवाच केले. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात असेल व नियमांचे पालन केले जाईल अशा ठिकाणी लॉकडाऊन मध्ये २० एप्रिलनंतर आटीच्या आधीन राहून काही प्रमाणात सूट देण्यात येईल, असे संकेतही पंतप्रधान मोदी यांनी दिले. लॉकडाऊन : १ मध्ये केलेल्या चुकांमधून शिकून त्या दुरुस्त करण्याची खऱ्याअर्थाने गरज आहे. त्याशिवाय कोरोन विरोधातील हे युद्ध जिंकणे शक्य नाही हे वास्तव आहे, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते सारंग कामतेकर यांनी मांडली आहे.

*****
लॉकडाऊनमुळे एकीकडे अनेक नागरिकांना अतोनात कष्ट पडत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी घरातून बाहेर पडण्याची मुभा लॉकडाऊन मध्ये देण्यात आली. परंतु नेमक्या याच गोष्टीचा गैरफायदा काही जणांनी घेतला. ५-१० % लोकांमुळे नियम पाळणाऱ्या ९०-९५ % लोकांना निष्कारण त्रास सोसावा लागणार असे वाटू लागले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली काही जण रस्त्यावर उनाडक्या करत बसले, तर काहीजण कंटाळा आला असे सांगून फेरफटका मारायला बाहेर पडले. काही महाभाग तर रस्ते मोकळे आहेत कि नाही याची तथाकथित पाहणी करायला बाहेर पडले. मात्र अशा विनाकरण फिरणाऱ्या अनेक अतिशाहण्यांना पोलिसांचा प्रसाद खावा लागला. त्याचे अनेक विडीओ सोशल मिडिया वर वायरल देखील झाले. परंतु त्याचा फटका अनेक वैद्यकीय कर्मचारी व जीवनावश्यक वस्तूंची सेवा नागरिकांना अविरतपणे पुरविण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या प्रमाणि लोकांना भोगावा लागला. तसेच विनाकारण फिरणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची शक्ती नाहक खर्च होत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

लॉकडाऊन : १ च्या काळात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्याचे आभार मांडण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रथम आपआपल्या घरातील खिडकीत उभे राहून थाळीनाद करण्याची विनंती केली. परंतु काही अतिउत्साही मंडळींनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मिरवणुका काढल्या व लॉकडाऊन मध्ये अपेक्षित सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजविले. संपूर्ण देश एकजुटीने कोरोन वोरोधात लढत असल्याची भावना लोकांमध्ये जागृत व्हावी या दृष्टीने पंतप्रधान मोदींनी आवाहन केली कि, प्रत्येकाने आपल्या घराचे दिवे रात्री ९ वाजता ९ मिनिटासाठी बंद करावे व आपल्या दारात दिवा लावावा. थाळी नाद करताना दाखविलेला अतिउत्साह दाखवू नका असे देखील पंतप्रधानांनी सांगितले. एकाच वेळी देशाचे सर्व दिवे बंद केले तर ग्रीड फेल होईल असे तर्क काही तथाकथित तज्ञांनी सांगून आपली अक्कल पाजळली. तर घरातील विजेवर चालणारे दिवे बंद करून शांतपणे हातात दिवा घेऊन उभे राहण्याच्या ऐवजी काही जणांनी रस्त्यावर उतरून फटाके फोडण्याचा मूर्खपणा केला व काहींनी मशाल मोर्चा काढण्याचा प्रताप केला. प्रत्यक्षात ग्रीड फेल झाले नाही परंतु त्यामुळे समाजामध्ये निष्कारण संभ्रम निर्माण झाला. सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली व सामुहिक प्रार्थना करण्यावर लॉकडाऊन काळात बंदी घालण्यात आली परंतु आपआपले धर्माचे पालन स्वातंत्र्य असल्याचा तर्क लढवीत काही जणांनी घराच्या गच्चीवर सामुहिक प्रार्थना करण्याचा अट्टाहास केला. देशात कायदा सर्वांना एकसारखाच लागू होतो हे अशा लोकांना कळलेच नाही. त्यामुळे विनाकरण धार्मिक तेढ निर्माण झाली. लॉकडाऊन : १ मध्ये फेसबुक, वाॅट्सॲाप सारख्या समाजमाध्यमांवर देशात दुही माजविण्याचे विडीओ व मेसेज यांची सत्यता न तपासताच फिरविण्यात अनेकांना धन्यता वाटली. काही जणांना अशा विडीओ व मेसेजवर प्रतिक्रिया देऊन जग जिंकल्यासारखे वाटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा दम भरावा लागला.
२५ मार्च ला लॉकडाऊन : १ घोषित झाल्यावर विविध प्रांतातून दुसऱ्या राज्यात काम करणाऱ्या अथवा ग्रामीण भागातून शहरात काम करणाऱ्या हजारो कष्टकऱ्यांचा गोंधळ उडाला. मूळ गावी परतताना या लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अथवा त्यांच्यामुळे गावागावात कोरोना पोहचू शकतो हा सर्वात मोठा धोका असल्याने शासनाने दळणवळणाच्या सर्व सेवा बंद ठेवल्या. काम बंद असल्याने उत्त्पन्न बुडाले, हातात अपुरे पैसे व घरच्यांकडून वारंवार सुरु आलेले काळजीचे फोन यामुळे हे सर्वजण हताश झाले. मूळ गावापासून लांब कामाला असल्याने अनेक जणांकडे रेशन कार्ड उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत अशा लोकांना मिळू शकली नाही. हातावर पोट असणारी हि मंडळी जगण्यासाठी दिवस रात्र आतोनात कष्ट घेतात. अशा लोकांना मदत करणे अथवा धीर देण्याऐवजी आपण काही जणांनी निष्कारण प्रांतवाद उकरून काढला. “भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत” लहानपणी शाळेत घेतलेल्या या शपथेचा विसर आपल्याला झाला आहे. खरेतर अशा संकट समयी ज्याला शक्य असेल त्यांनी यथाशक्ती मदत करणे अपेक्षित आहे.

****

सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करा…
लॉकडाऊन : २ काळामध्ये या सर्व चुकांमधून आपण शिकले पाहिजे. लॉकडाऊन : २ च्या काळात घरातच राहून शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता आहे. तसेच या चुकांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करायची खरच आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावे. तसेच किराणा अथवा भाजी विकत घेताना शिस्तीचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळावे. कोरोन विरोधातील या लढ्यात सर्वात महत्वाचे शस्त्र हे ” स्वयंशिस्त ” आहे. समाज माध्यमावर काही प्रसारित करताना त्याची सत्यता पडताळावी, ज्या गोष्टीमुळे सकारात्मकता वाढेल असेच लेख अथवा विडीओ पोस्ट करावे. धार्मिक अथवा प्रांतिक तेढ निर्माण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, कचरा साफसफाई करणारी कर्मचारी, पोलीस, आपल्याला धान्य व भाजीपाला पुरविणारे शेतकरी व छोटे व्यवसायिक, आपल्या पर्यंत माहिती पुरविणारे पत्रकार, बँक कर्मचारी आणि हितासाठी आपल्यासाठी झटणाऱ्या सर्व लोकांचे आपण आभार मानले पाहिजेत. त्यांचेही कुटुंब आहे याची जाणीव आपल्याला हवी.

 कष्टकरी नागरिकांना धीर देण्याची गरज…
आपल्या धर्माची उपासना आपण घरात बसून सुद्धा करू शकतो त्यामुळे सामुहिकपणे प्रार्थना करणे अथवा इतर धार्मिक कार्यक्रम कोणीही घेऊ नये. सर्व धर्म हे मानवसेवेला सर्वोच्च मानतात, त्यामुळे आपल्याला शक्य असल्यास अडचणीत असलेल्या आपल्या बांधवांना मदत करावी.
या अडचणीच्या काळात अनेक दानशूर व्यक्ती, समाजसेवक, समाजसेवी संस्था, राजकारणी हे आपआपल्यापरीने मदत करत आहेतच. अशा लोकांनी अन्न धान्य अथवा इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करताना ‘सोशल डिस्टंसिंग’ ची पुरेपूर काळजी घ्यावी. लॉकडाऊन अडकलेले परप्रांतातील अथवा ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांना धीर द्यावा व त्यांचे मनोबल वाढवावे.

****

‘लॉकडाऊन’ ही अडचण नव्‍हे संधी…

लॉकडाऊन :२ ही अडचण नसून संधी आहे, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची, स्वत:शी अंतर्मुख होण्याची,घरी बसल्यावर आपले छंद जोपासण्याची, स्वत:ला वेळ देण्याची. आपण भारतीय अनेक संकटांना तोंड देत आपला देश प्रगतीकडे नेत आहोत. कोरोना विरोधातील लढ्यात संपूर्ण भारत एकवटला आहे याचे दर्शन आपण विश्वाला घडवूयात. हे युद्ध आपण जिंकणारच यात कोणतीही शंका नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button