TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

राज्यात अपघातांच्या प्रमाणात १३ टक्क्यांनी वाढ

नागपूर : अपघात नियंत्रणासाठी विविध उपाय करत असल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाकडून नेहमीच केला जातो; परंतु राज्यात गेल्या तीन वर्षांत अपघात, अपघातातील मृत्यू व जखमींची संख्या वाढली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांतील सारख्या कालावधीची तुलनात केल्यास या नऊ महिन्यांत अपघात १४.७२ टक्के, अपघाती मृत्यू १२.८७ टक्के, अपघातातील जखमींची संख्या २२ टक्यांनी वाढली.

राज्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२० या काळात १६ हजार ७९७ अपघात झाले. त्यात ७ हजार ७६८ जणांचा मृत्यू तर, १३ हजार ४९२ जण जखमी झाले. २०२१ मध्ये सारख्याच कालावधीत राज्यात २१ हजार २३३ अपघात झाले. त्यात ९ हजार ८७७ जणांचा मृत्यू तर, १६ हजार ३७२ जण जखमी झाले.

ही संख्या २०२२ मध्ये आणखी वाढली. या काळात राज्यात २४ हजार ३६० अपघात झाले. त्यात ११ हजार १४९ जणांचा मृत्यू तर १९ हजार ९७१ जण जखमी झाले. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांतील जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीची तुलना केल्यास राज्यात अपघात ३ हजार १२७ (१४.७२ टक्के) ने वाढले. अपघाती मृत्यू १ हजार २७२ (१२.८७ टक्के) आणि अपघाती जखमींची संख्याही ३ हजार ५९९ (२१.९८ टक्के)ने वाढली आहे.

मुंबईत एक हजारावर अपघात..

जानेवारी ते सप्टेंबर २०२२ दरम्यान नऊ महिन्यांच्या कालावधीत एक हजारावर अपघात मुंबई शहर (१,३९८ अपघात), पुणे ग्रामीण (१,१८७ अपघात), अहमदनगर (१,१९७ अपघात), नाशिक ग्रामीण (१,०८६ अपघात) येथे नोंदवले गेले.

पाच शहर व जिल्ह्यांत चारशेहून अधिक मृत्यू..

जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या काळात राज्यातील पुणे ग्रामीण (६६१ मृत्यू), सोलापूर ग्रामीण (४३६ मृत्यू), अहमदनगर (६२७ मृत्यू), जळगाव (४१५ मृत्यू), नाशिक ग्रामीण (६९२ मृत्यू) या पाच जिल्ह्यांत राज्यातील सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले. नागपूर शहर २३२, पुणे शहर २४१, ठाणे शहर १७०, मुंबई शहर २१४, नाशिक शहर १३१ जणांचा मृत्यू नोंदवला गेला.

अपघात नियंत्रणाबाबत परिवहन आयुक्त कार्यालय गंभीर आहे. त्यामुळे विविध पातळय़ांवर काम सुरू आहे. त्यानुसार आता गाव- जिल्हा पातळीवर अपघाताचे कारण शोधून स्थानिक पातळीवर त्यानुसारच अपघात नियंत्रणाचे उपाय केले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कारवाई स्थानिक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मदतीने विविध यंत्रणेशी समन्वय करून केली जात आहे.

– विवेक भिमनवारपरिवहन आयुक्तमुंबई

तीन जिल्ह्यांत अपघातांत घट..

नांदेडमध्ये अपघातांची संख्या जानेवारी ते सप्टेंबर २०२१ च्या तुलनेत २०२२ मधील सारख्याच कालावधीत ४७ ने कमी झाली. धुळे येथे १७, मुंबई शहरात २४५, नाशिक शहरात १९ ने अपघात कमी झाले.

ऑक्टोबर- २०२२ मध्ये अडीच हजार अपघात..

राज्यात ऑक्टोबर २०२२ मध्येही २ हजार ६५३ अपघात झाले. त्यात १ हजार १२८ जणांचा मृत्यू तर २ हजार ३४१ जण जखमी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button