TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

11th HI Sr. Men Natl C’hip 2021 : पंजाब-उत्तर प्रदेश संघात रंगणार अंतिम लढत

पिंपरी चिंचवड | बलाढ्य पंजाब आणि उत्तर प्रदेश यांच्यात 11व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. येथील नेहरुनगर मधील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या आजच्या उपांत्य लढतीत उत्तर प्रदेशाने हॉकी कर्नाटकाचा 2-1 आणि पंजाबने यजमान हॉकी महाराष्ट्राचा 3-0 असा पराभव केला.पाच वेळा अंतिम लढत खेळणाऱ्या पंजाबविरुद्ध महाराष्ट्राची सुरवात सनसनाटी होती. त्यांनी कमालीचा वेगवान खेळ करताना सुरवातीलाचा तीन पेनल्टी कॉर्नर मिळविले. मात्र, त्यांना ते साधता आले नाहीत. पंजाबचा गोलरक्षक कमलबीर सिंग याने शिताफीने महाराष्ट्राचे तीनही प्रयत्न फोल ठरवले.

दुसरीकडे पंजाबने नंतर खेळावर नियंत्रण मिळवले आणि दोन कॉर्नर मिळवले. त्या वेळी एकेकाळी संघ सहकारी असलेला गोलरक्षक आकाश चिकटे रुपिंदरच्या शॉटचा अंदाज घेऊ शकला नाही. सामन्याच्या २८व्या मिनिटाला रुपिंदरने कॉर्नर सत्कारणी लावताना पंजाबला आघाडी मिळवून दिली. अर्थात, महाराष्ट्रानेही बचाव भक्कम राखला होता. त्यामुळे मध्यंतराला पंजाबला 1-0 अशाच आघाडीवर समाधान मानावे लागले.

उत्तरार्धात सुरवातीलाच सुदर्शन सिंग याने 39व्या मिनिटाला गोलपोस्टचे अचूक लक्ष्य साधत पंजाबला 2-0 असे आघाडीवर नेले. सात मिनिटांनी मिळालेला कॉर्नर रुपिंदरने पुन्हा एकदा सत्कराणी लावला आणि पंजाबची बाजू भक्कम केली. हीच आघाडी कायम ठेवताना पंजाबाने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली.

त्यापूर्वी, दोन माजी उपविजेत्या संघातील लढतीत उत्तर प्रदेशाने बाजी मारली. पहिल्या पाच मिनिटांत उत्तर प्रदेशाचा दबदबा होता. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला महंमद अमिर खानने अगदी जवळून कर्नाटकाच्या गोलरक्षक सोमण्णा शरथ के.पी.ला चकवले. त्यानंतर आठव्याच मिनिटाला विशाल सिंगने आणखी एक गोल करत कर्नाटकाला स्थिरावण्यापूर्वीच दडपणाखाली आणले.

त्यानंतर कर्नाटकानेही हर तऱ्हेने प्रयत्न केले. पण, त्यांना गोल करण्याच्या संधी साधता आल्या नाहीत. सामन्याच्या 22व्या मिनिटाला महंमद राहिलने गोल करून कर्नाटकाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, यानंतरही कर्नाटकाला बरोबरी साधण्यात अपयश आले. त्यामुळे विश्रांतीला 2-1 अशा आघाडीवरच सामना थांबला होता. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून कमी अधिक प्रमाणात गोल करण्याचे प्रयत्न झाले मात्र, कुणालाही यश आले नाही. मध्यंतराचीच आघाडी राखत उत्तर प्रदेशाने विजय साकार केला.

आम्ही स्पर्धेत सहभागी झाल्यावर एका वेळेस एकाच सामन्याचा विचार केला. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आम्हाला हेच सातत्य अंतिम सामन्यापर्यंत राखायचे आहे. आमच्या विजयात गोलरक्षक आयुष द्विवेदी याचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या अभेद्य गोलरक्षणाने आमचा आत्मविश्वास उंचावला, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशाचा कर्णधार विवेकने व्यक्त केली. आम्हाला पुणे दौऱ्याची अखेर सुवर्णपदकाने करायची आहे. उत्तर प्रदेशाच्या वाटचालीत त्याचीच कमतरता आहे, असेही तो म्हणाला.

निकाल –

हॉकी उत्तर प्रदेश (महंमद अमीर खान 4थे, विशाल सिंग 8वे मिनिट) वि.वि. हॉकी कर्नाटक 1 (महंमद राहिल 22वे मिनिट) मध्यंतर 2-1
हॉकी पंजाब 2 (रुपिंदर पाल सिंग 28वे, 46वे मिनिट, सुदर्शन सिंग 39वे मिनिट) वि.वि. हॉकी महाराष्ट्र 0 मध्यंतर 1-0

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button