TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

१० महिन्यांत १० प्रकरणे उघडकीस; नवजात बाळविक्रीत नागपूर केंद्रस्थानी

नागपूर : महाराष्ट्रासह अन्य राज्यात नवजात बाळ विक्री करण्यासाठी नागपूर शहर देशात केंद्रस्थानी असून आतापर्यंत ४० ते ५० नवजात बाळांची नागपुरातून परराज्यात विक्री झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक राज्यात नागपुरातील बाळांची विक्री झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या १० महिन्यांत १० बाळांची विक्री केल्याची नोंद पोलिसांकडे आहे.

एखाद्या महिलेला गर्भधारणा होण्यात अडचणी, जन्मजात गर्भाशय नसणे, वारंवार गर्भपात होणे, एखाद्या आजारामुळे गर्भाशय जननक्षम नसणे, पती नपुंसक असणे, प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या जीवाला धोका, अशा अनेक कारणांमुळे वैवाहिक जीवनात महिला बाळाला जन्म देऊ शकत नाही. तसेच समिलगी दाम्पत्यांना बाळ हवे असल्यास बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेतल्या जातो. या भावनिक आणि कौटुंबिक गरजेतून कोटय़वधींमध्ये उलाढाल करणारे बाळविक्रीचे रॅकेट तयार होते. लाखोंमध्ये पैसे मोजून नवजात बाळ घेण्यासाठी अनेक दाम्पत्य रांगा लावून असतात. अशा धनाढय़ दाम्पत्यांना हेरून बाळ विक्री करणाऱ्या रॅकेटची संख्या नागपुरात जास्त आहे. देशातील अनेक राज्यात बाळ विक्री करणाऱ्या टोळीसाठी नागपूर हे नंदनवन ठरत आहे. राज्यातील बाळविक्रीचे पहिले प्रकरण नागपूर एएचटीयूने शोधून काढले होते.

गेल्या १० महिन्यांत १० बाळांची विक्री केल्याची नोंद पोलिसांकडे आहे. निपुत्रिक दाम्पत्यांना नवजात बाळ विक्री करण्यासाठी नागपूर शहर हे राज्याचे मुख्य केंद्र बनले आहे. नागपुरात गेल्या वर्षांपासून बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ा कार्यरत आहेत. आयशा ऊर्फ श्वेता खान या मध्यप्रदेशातील टोळीप्रमुखाने नागपुरात येऊन अनेक बाळांची विक्री केली. तर राजश्री सेन, सीमा परवीन, तोतया डॉ. विलास भोयर, विभूती यांच्या टोळय़ा बाळ विक्री प्रकरणात सक्रिय असून या सर्व आरोपींनी अनेक राज्यात नवजात बाळांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

टोळीचे काम कसे चालते?

आयशा खान, राजश्री सेन, डॉ. विलास भोयर यासारखे टोळीप्रमुख उपराजधानीतील अनेक मोठय़ा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि लॅब टेक्निशियन यांना हाताशी धरतात. ज्या महिलांना बाळ नको आहे, अनैतिक संबंधातून अविवाहित तरुणी गर्भवती झाल्यास किंवा आर्थिक परिस्थितीमुळे बाळ नको असलेल्यांचा शोध घेण्याचे काम ही टोळी करते. अविवाहित गभर्वती तरुणींना चक्क १ ते २ लाखांची ऑफर देऊन बाळांचा गर्भातच सौदा करतात. तर नको असलेले बाळ जन्मास आल्यास रुग्णालय काल्पनिक नावाने गर्भवती नोंद करून बाळ जन्मास येताच विक्री करतात.

परराज्यात बाळ विक्रीस प्राधान्य 

नागपुरातील बाळविक्री करणाऱ्या टोळय़ा महाराष्ट्रापेक्षा अन्य राज्यात बाळविक्रीला प्राधान्य देतात. कारण, अन्य राज्यातील दाम्पत्य बाळाची किंमत ७ ते १० लाखांपर्यंत मोजायला सहज तयार होतात. यामुळे बाळाच्या आई-वडिलांचाही संपर्क तुटण्यास मदत होते. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात बाळ विकल्यास पोलीस, सामाजिक संघटना यांच्यामार्फत सत्य बाहेर येण्याची भीती असते. त्यामुळे महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांला प्राधान्य दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दत्तक घेण्याची प्रक्रिया किचकट

केंद्र सरकारने मुल दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण म्हणजेच सीएआरएची (कारा) स्थापना केली आहे. ही संस्था समन्वय मंडळासारखे कार्य करते. ज्याद्वारे अनाथ, आत्मसमर्पण केलेल्या मुलांना दत्तक दिले जाते. परंतु, येथे अर्ज केल्यानंतर जवळपास २ ते ३ वर्षे थांबावे लागते. तसेच कायदेशीर प्रक्रिया खूपच किचकट असल्यामुळे धनाढय़ दाम्पत्य पैसा खर्च करून बेकायदेशीर मार्गाने बाळ मिळवतात.

बाळविक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाळाची परराज्यात विक्री केल्याचे लक्षात आले आहे. आरोपींची कसून चौकशी सुरू असून आणखी काही ठिकाणी बाळांची विक्री केली का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button