पुण्यात अजितदादांच्या वाढदिवसानिम्मित एका रुपयात 1 लिटर पेट्रोल, ग्राहकांची झुंबड!
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 वाढदिवस आज साजरा होत आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने पुणेकरांमध्ये आज उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नगण्य दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच चांदी झाली आहे. पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा प्रतिलीटर दर १०७ रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील धानोरी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केवळ 1 रुपयात एक लिटर पेट्रोल देण्यात येत आहे. त्यामुळे, येथील ठिकाणावर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेकांनी गर्दी केली आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
पेट्रोल दरवाढीसाठी केंद्र सरकार कसं जबाबदार आहे, हे वारंवार अजित पवार यांनी दाखवून दिलंय, तशी टीका ते वारंवार करत असतात. राष्ट्रवादीने महागाई विरोधात अनेक वेळा आंदोलनही केलं आहे. आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे.