22 लाखाच्या बदल्यात 1 कोटी उकळले, आणखी पैशासाठी तगादा लावणाऱ्या दोघांना अटक
पुणे | 22 लाखाच्या कर्जपोटी 1 कोटी रुपये वसूल केल्यानंतरही आणखी पैसे द्यावेत म्हणून धमकावणाऱ्या दोन सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश राजेंद्र देवेंद्र (वय 35, रा. मंगळवार पेठ) आणि राजू उर्फ जॉन राजेंद्र देवेंद्र (वय 38, रा. सोमवार पेठ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी 39 वर्षीय तक्रारदाराने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, राजू उर्फ जॉन हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावरखुनासह इतर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची देखील कारवाई करण्यात आलेली आहे.
यातील फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. 2012 साली त्यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. वेळोवेळी त्यांनी एकूण 20 ते 22 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले होते. त्याबदल्यात ते आरोपींना महिन्याला व्याज देखील देत असत. गेल्या आठ वर्षात या आरोपींनी त्यांच्याकडून २२ लाखांच्या बदल्यात तब्बल १ कोटी रुपयांचे व्याज बसूल केले होते. तर, आणखी पैसे देण्याची मागणी ते करत होते. पैसे न दिल्यास त्यांना धमकावत अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात होती. तर, त्यांच्या कुटूंबाबात देखील अश्लील बोलण्यात येत होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना त्यांच्या एका मित्रामार्फत हा प्रकार समजला. परंतु, तक्रारदार भितीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. पाटील यांनी त्यांना धीर देऊन पोलीस तुमच्यासोबत असतील असे सांगत विश्वास निर्माण केला. त्यानंतर तक्रारदाराने तक्रार दिली. तसेच, सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.