breaking-newsक्रिडा

हॅटट्रीकनंतर शमीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘माझी इतकीच इच्छा की…’

शनिवारी साऊदम्पटनच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर मात करत आपली विजयी घौडदौड कायम राखली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने अफगाणिस्तानसमोर २२५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद नबी, गुलबदीन नैब, रेहमत शाह यांनी आक्रमक फलंदाजी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विजय खेचून आणला. मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात ३ बळी घेत हॅटट्रीकची नोंद केली. २०१९ विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. शमीच्या या कामगिरीवर त्याची पत्नी हसीन जहाँने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘अमर उजाला’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हसीन जहाँने, ‘देशासाठी खेळणे प्रत्येक खेळाडूसाठी गर्वाची गोष्ट असते. त्यातही सामना जिंकणे आणखीन चांगली गोष्ट असते’ असे मत व्यक्त केले आहे. भारताने विश्वचषक जिंकावा इतकीच माझी इच्छा आहे असंही हसीन यावेळी म्हणाली. शमीच्या खेळीबद्दल थेट कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे हसीनने टाळले मात्र भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर कमागिरीमधील सातत्य कायम राखणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले आहे.

शमीचा खडतर प्रवास

अफगाणिस्तान विरुद्धच्या कामगिरीनंतर देशातील करोडो क्रिकेट चाहत्यांनी शमीचे कौतुक केले असले तरी एक वेळ अशी आली होती जेव्हा शमीवर त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे त्याची कारकिर्द धोक्यात आली होती. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने शमी आणि त्याच्या कुटुंबावर जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. शमीचे इतर महिलांशी संबंध असून त्याच कारणावरुन तो मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप हसीनने केला होता. शमीच्या घरची मंडळी मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करत होते असा आरोपही हसीन हिने केला होता. मात्र शमीवर लावण्यात आलेल्या या आरोपानंतरही बीसीसीआयने शमीच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. शमी प्रकरणावर बोर्डाने एक चौकशी समिती नेमली आणि या समितीने शमीला क्लिनचीट दिली. या चौकशी दरम्यान काही काळ शमीला मैदानाबाहेर बसावे लागले होते. शमीवर हसीन वारंवार आरोप लावत होती मात्र बोर्डाने शमीची साथ सोडली नाही. एकीकडे खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार येत असताना मैदानात शमीची कामगिरी अव्वलच राहिली. त्यामुळेच त्याला विश्वचषक स्पर्धेचे तिकीटही मिळाले. शमीने त्याच्यावरील विश्वास योग्य असल्याचे सिद्ध करत अफागणिस्तानविरुद्ध हॅटट्रीकची नोंद करत भारताला ११ धावांनी निसटा विजय मिळवून दिला. विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीक घेणारा शमी हा  दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. १९८७ साली भारताचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांनी अशी कामगिरी केली होती. शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ९.५ षटकांत १ षटक निर्धाव टाकत ४० धावा देऊन ४ बळी घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button