breaking-newsपुणे

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ वर्षांत धावणार

पुणे |महाईन्यूज|

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. त्यात पुणे शहर, परिसराच्या विकासाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. बैठकीत पुणे महानगर प्रदेश शहरीकरणाचा आढावा घेण्यात आला. पुण्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत; तसेच शहराचे सौंदर्य जपून महापालिकेच्या समन्वयातून विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

परिवहन, सामाजिक, पायाभूत सुविधा, पर्यावरणविषयक प्रकल्प आणि नगरविकासाचे नियोजन याबाबतचा मूलभूत प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. पुणे महानगर परिसराचा सर्वंकष वाहतूक आराखडा मांडण्यात आला. पुण्यात सध्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वापर 71 टक्के असून तो सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या माध्यमातून कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

सर्वंकष वाहतूक आराखड्याची चार टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. तातडीच्या उपाययोजनेमध्ये पहिल्या तीन मेट्रो मार्गिका कार्यरत करण्यात येणार आहेत. यावेळी मेट्रोसाठी भूसंपादन, वर्तुळाकार बाह्य वळण रस्ता, पाणीपुरवठा योजना, विकास आराखडा, प्रादेशिक योजनांचा आराखडा, नगररचना योजना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, परवडणारी घरे याबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पीएमआरडीए आयुक्त विक्रमकुमार यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button