breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडी: त्या मुलींच्या कुटूंबियांची खा. प्रितम मुंडेंनी घेतली भेट, तर धनंजय मुंडे सरकारवर भडकले

पिंपरी (महा ई न्यूज) – हिंजवडी (पुणे) परिसरात नुकत्याच झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या कुटूंबियांची खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी आज भेट घेतली व त्यांना धीर दिला. पीडितेच्या कुटूंबियांना शासकीय सहाय्य करण्याबरोबरच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी सांगितले. तथापि, राज्यात कायदा व सुव्यवस्थाच शिल्लक नसून शाळेत जाणा-या मुलीही सुरक्षीत नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही. कुठे आहेत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा आणि कुठे आहे महामंडळ, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे उपस्थित करत भाजपवर टिका केली आहे.

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या या अत्याचाराची गंभीर दखल घेतली आहे. पीडितेच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार त्यांच्या वतीने खासदार प्रितम मुंडे यांनी आज हिंजवडी परिसरात राहणा-या ‘त्या’ पीडितेच्या आई वडिलांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. झालेली घटना मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. ‘तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याकडूनही त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अशोक मुंडे, भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, तळेगांवचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रियांका बारसे, केशव घोळवे आणि रवि खेडकर, दीपक नागरगोजे, आबा नागरगोजे, संतोष राख आदी उपस्थित होते.

आयुक्त पद्मनाभन यांच्याशी फोनवर बातचीत

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आणि पोलिस आयुक्तांशी फोनवर चर्चा या घटनेसंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन् यांच्याशी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी यावेळी दूरध्वनीवरून चर्चा केली. घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जामीन मिळता कामा नये, असे त्या म्हणाल्या. ही घटना अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे त्याचे भांडवल करू नका. अथवा याबाबत सोशल  मिडियामध्ये पसरविल्या जाणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

सरकार मुलींनाही सुरक्षा देऊ शकत नाही, हे चिंताजनक – धनंजय मुंडे

खासदार मुंडे यांच्या या भेटीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र, भाजपवर सडकून टिका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सरकारला जाब विचारला आहे. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, हिंजवडी परिसरातील ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना संतापजनक आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थाच शिल्लक नसून शाळेत जाणा-या मुलीही सुरक्षीत नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही. कुठे आहेत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा आणि कुठे आहे महामंडळ, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. या अत्याचाराच्या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करावी. ऊसतोड कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि कायदा व सुव्येवस्था याबाबत मी सरकारला आगामी अधिवेशनात जाब विचारणार असल्याचेही मुंडे यांनी ट्विटरद्वारे नमूद केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button