breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वाभिमानीचा आघाडीला उद्यापर्यंतचा अल्टीमेटम

पुणे – भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत, परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा, उद्यापर्यंत निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तसेच हातकणंगलेसह लोकसभेच्या बुलढाणा व वर्धा या तीन जागांसाठी स्वाभिमानी ठाम असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, प्रा. प्रकाश पोकळे, विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार, मराठवाडा विभाग अध्यक्ष माणिकराव कदम, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष घनशाम चौधरी व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीने आमचे काही मुद्दे मान्य केले आहेत. परंतु आघाडीच्या दोन्ही पक्षांनी हे मान्य केले पाहिजे तर आघाडीत जाण्याचा विचार करू. बुलढाण्याची जागा राष्ट्रवादीने सोडावी व वर्ध्याची जागा काँग्रेसने सोडावी, असा प्रस्ताव ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. माढ्याची जागा शरद पवार यांनी लढण्याची चर्चा आता संपुष्टात आल्याने तेथून आम्हाला संधी दिली तर आम्ही लढायला तयार आहोत. कारण मागील निवडणूकीत तेथे आम्ही थेट राष्ट्रवादीशी लढत दिली होती व त्यात आमचा निसटता पराभव झाला होता. यामुळे जर ही जागा आम्हाला लढवायला दिली तर आम्ही तयार आहोत. कारण येथून सहज विजय मिळवू.

महादेव जानकरांची व माझी भेट ही मैत्रीची भेट झाल्याचे सांगत छोट्या पक्षांना मोठ्या पक्षांकडून त्रास देण्याचे प्रयत्न होतच असतात. यामुळे जानकर युतीतून बाहेर पडले व आमचे आघाडीशी जुळले नाही तर रासप व आम्ही एकत्र लढण्याचाही विचार करू. आमची सोळा जणांची यादी तयार असून आघाडीने सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही या सगळ्या जागा स्वतंत्रपणे लढवायला सज्ज आहोत.

केवळ भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही आघाडीकडे प्रस्ताव दिला असून ते हा निर्णय सकारात्मकपणे घेतील अशी अपेक्षा आहे. हातकणंगलेची जागा ही आमचीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त बुलढाणा व वर्धा या दोनच जागा मागत आहोत. बुलढाणा येथून रविकांत तुपकर व वर्ध्यातून सुबोध मोहिते हे निवडणूक लढवतील असे एका प्रश्नावर उत्तर देतांना शेट्टी यांनी सांगितले. शरद पवारांच्या माढ्यातील माघारीबद्दल विचारले असता शरद पवारांनी राजकारणात पन्नास वर्षे घालवलेली आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय नक्कीच विचारपुर्वक असेल. पवारांनी निवडणूक हारण्याच्या भीतीने निर्णय बदलला हे म्हणणे योग्य नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. उद्या शेवटचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कळवला नाही तर आम्ही स्वतंत्रपणे लढण्यासाठी सज्ज आहोत, हा पुनर्रूच्चार शेट्टी यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button