breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायीच्या सभापती पदासाठी शत्रुघ्न काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

  • इतर समाजासह मराठा समाजालाही दिली जाणार संधी
  • भारतीय जनता पार्टीकडून सर्वांना समान न्याय

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना संधी देण्याचा निर्णय जवळपास नश्चित मानला जात आहे. यापूर्वी अनुसूचित जातीच्या चेह-यांना दोनवेळा संधी देण्यात आली. तर, ब्राम्हण आणि ओबीसी (माळी) समाजाला प्रत्येकी एकवेळा सभापती पदावर संधी दिली गेली. आता मराठा चेहरा म्हणून शत्रुघ्न काटे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यातच पाठीमागे महापौर पदावर वर्णी लागत असताना केवळ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी माघार घेतली होती. त्याची बक्षिसी म्हणून देखील काटे यांना ही संधी दिली जात असल्याचे मानले जात आहे.

भाजपाची सत्ता आल्यानंतर 2017 मध्ये स्थायी समिती सभापती पदावर अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून प्रथम सीमा सावळे यांना संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ संपताच पदावर ओबीसी समाजाला संधी देण्याची चर्चा झाली. मात्र, त्यानंतरही 2018 मध्ये भाऊंचे निकटवर्तीय मानले जाणारे व अनुसूचित जातीचा चेहरा असलेले माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी नगरसेविका ममता गायकवाड यांना संधी दिली गेली. 2019 मध्ये मात्र, यात बदल करून भाऊंनी ब्राह्मण समाजाला सभापती पद दिले. त्यावर विलास मडिगेरी यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2020 मध्ये सभापती पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या गटाला देण्यात आला. त्यावर महेशदादांनी ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्या गटातील माळी समाजाचे संतोष लोंढे यांना संधी दिली. त्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. त्यांच्यासह काहींचे राजीनामे घेतले जाणार आहेत.

आता 2021 या सत्ताधारी भाजपच्या शेवटच्या वर्षात मराठा समाजाला संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भाऊंनी यावर्षातील स्थायीच्या सभापती पदावर संधी देण्याचा अधिकार स्वतःकडे राखीव ठेवल्याची माहिती आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत भोसरीसह चिंचवडच्या नवीन चार नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य पदावर संधी दिली आहे. त्यातच मराठा समाजाचा चेहरा म्हणून सभापती पदावर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. तसेच, भोसरीचे नगरसेवक रवी लांडगे यांना देखील सभापती पदावर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, निर्णय घेण्याचे अधिकार चिंचवडला गेल्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button