breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, 143 कोटी गहाळ

स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेतील सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सर्व्हरवर हल्ला करत तब्बल 143 कोटींवर डल्ला टाकण्यात आल्याचा दावा बँकेने केला आहे. स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या नरिमन पॉईंट येथील शाखेने यासंबंधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे.

5 ऑक्टोबरला यासंबंधी तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेचा सर्व्हर हॅक करत वेगवेगळ्या खात्यांमध्ये शिरकाव करण्यात आला. यानंतर त्यांच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. ही सर्व बँक खाती देशाबाहेरची आहेत. सध्या पोलीस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

दरम्यान बँकेने यासंबंधी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल करण्यात आला असून, सायबर एक्स्पर्टच्या सहाय्याने तपास केला जात आहे. ‘सध्याच्या घडीला हा सायबर हल्ला आहे की नाही हे सांगू शकत नाही. बँकेतील अंतर्गत तपास सुरु असून आतमधील कोणी मदत केली आहे का यादृष्टीनेही तपास सुरु आहे’, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

बँकेला गंडा घालण्यात आल्याची गेल्या नऊ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. चेन्नईतील सिटी युनिअन बँकेतून 34 कोटींची रक्कम गहाळ झाली होती. तसंच ऑगस्ट महिन्यात कॉसमॉस बँकेच्या पुणे मुख्यालयातील 94 कोटींची रक्कम लूटण्यात आली होती. कॉसमॉस प्रकरणात ७८ कोटींची रक्कम २८ देशातील एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. कॉसमॉस बँक चोरी प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. तपास केला असताना चेन्नईतील बँक दरोड्यातही त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं.

गेल्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये चेन्नईतील सिटी युनियन बँकेचा सर्व्हर हॅक करून चोरट्यांनी ३३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रोकड लुटल्याची घटना घडली होती. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यात सर्व्हर हॅक करून ९४ कोटी रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली. पोलिसांनी औरंगाबाद, नांदेड, मुंबई परिसरातून सात आरोपींना अटक केली होती. सात आरोपींनी बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून विविध बँकांच्या एटीएम केंद्रातून रोकड काढून घेतली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने त्यांना बनावट डेबिट कार्ड देऊन रोकड काढण्याच्या बदल्यात काही मोबदला दिल्याचा संशय होता. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले शेख महंमद, फहीम खान, ऑगस्टीन वाझ उर्फ अँथोनी आणि नरेश महाराणा यांचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेतील रोकड लूट प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button