breaking-newsआंतरराष्टीय

सौदी अरेबियाशी संघर्षांमुळे कतारची ‘ओपेक’मधून माघार

ऊर्जासंपन्न असलेल्या कतार या लहानशा अरब देशाने ओपेक (ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिग कंट्रीज) या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेतून जानेवारी २०१९ पासून बाहेर पडण्याचे सोमवारी जाहीर केले आहे. या आठवडय़ातील ओपेकच्या बैठकीस कतार हजेरी लावणार आहे. तेलाच्या किमती कमी होत असताना घसरण थांबवण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करण्याच्या आवाहनास कतारने प्रतिसाद न देता उत्पादन वाढवण्याचे समर्थन केले आहे. ओपेक मधील बलाढय़ देश असलेल्या सौदी अरेबियाने कतारवर बहिष्कार टाकल्याने असलेली नाराजी यातून व्यक्त झाली आहे.

कतारचे ऊर्जामंत्री साद शेरिदा अल काबी यांनी अचानक ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर या संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले असून, २०१६ मध्ये तेलाच्या किमती पिंपाला ३० डॉलरपेक्षा कमी झाल्याने उत्पादन कपातीस सदस्य नसलेल्या देशांना राजी करण्याचे आव्हान या संघटनेपुढे होते. १९६० मध्ये ओपेकची स्थापना झाल्यानंतर कतारने या संघटनेतून प्रथमच माघार घेतली असून, कतारचे ऊर्जामंत्री अल काबी यांनी सांगितले, की यापुढे आमचा देश एलपीजी वायूची निर्यात वर्षांला ७७ दशलक्ष टनावरून ११० दशलक्ष टन करणार आहे.

कतारने तेलाचे उत्पादनही दिवसाला ४८ लाख पिंपावरून ६५ लाख पिंपे इतके करण्याचे ठरवले आहे. एक विश्वासार्ह ऊर्जा पुरवठादार देश म्हणून कतारला पुढे येण्याची इच्छा असून त्यासाठी आम्ही तेल व वायू निर्यातही वाढवणार आहोत. आंतरराष्ट्रीय ऊर्जापटावर कतारच्या स्थितीचा आम्ही फेरविचार करीत आहोत.

व्हिएन्नातील ओपेक या संघटनेने लगेच प्रतिक्रिया देताना याच महिन्यात बैठक घेऊन उत्पादन कपातीबाबत चर्चा करण्याचे सूचित केले आहे. कतार हा २६ लाख लोकसंख्येचा देश असून १९७१ मध्ये तेथे नॉर्थ फिल्ड येथे तेल सापडले होते. तो साठा वापरात आणण्यासाठी अभियंत्यांना मेहनत करावी लागली. नंतर जागतिक तेल व्यापारात कतार हा रशिया व इराणनंतर तिसऱ्या क्रमांकावर आला. तेलामुळे कतारची संपत्ती जास्त असून त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थान मिळत गेले. ओपेकचा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियाशी त्याचे खटके उडत गेले. जून २०१७ मध्ये बहारिन, इजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यांनी कतारवर राजकीय भांडणातून बहिष्कार टाकला होता. त्यांच्यातील भांडणे अजून सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button