सोशल मीडियाचा प्रस्ताव फेटाळला
पिंपरी- महापालिकेची प्रतिमा निर्मिती करण्यासाठी नागरिकांना सोशल मीडियाद्वारे विविध योजना, उपक्रम व विकास कामांची माहिती देण्यात येणार होती. त्यासाठी वर्षाला 25 लाखाचा खर्च करण्यात येणार होता. त्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर हा प्रस्ताव विद्यमान स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत फेटाळला आहे.
सद्यसिस्थीत सोशल मिडीया हे प्रभावी माध्यम आहे. त्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध योजना, उपक्रम, विकासकामे प्रत्येक नागरिकांना माहितीपर पोहचविले जाणार होते. तसेच, रेडीओ, जिंगल्स, डॉक्यूमेंटरी फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, लाँग फिल्म्स आदींच्या माध्यमातून ही माहिती जनतेसमोर सादर करण्यात येणार होती. त्याकरिता माध्यम समन्वयक संस्थेची नेमणूक करण्यात येणार होती. त्या संस्थेला प्रत्येक वर्षाला सुमारे 25 लाख रुपये रक्कम खर्च करावी लागणार होती. मात्र, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. त्यावर सामाजिक स्वयंसेवी संस्थाकडून विरोध दर्शविला होता. वाढत्या विरोधानंतर सत्ताधा-यांनी दोन स्थायी समितीच्या सभांमध्ये हा विषय तहकूब ठेवला होता. परंतू, अखेर हा विषय फेटाळण्यात आला आहे.