breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सेना- राष्ट्रवादीच्या दादागिरीला आता गुंडगिरीच्याच भाषेत उत्तर देणार: भाजप नगरसेवक संदीप कस्पटे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना झालेल्या मारहाण प्रकरणात राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे कडक कायदेशीर कारवाई करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. कायदा सर्वांना समान असेल तर त्याची पोलिसांकडून अंमलबजावणी व्हावी, अशी सर्वांचीच मागणी आहे. भाजपच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला मारहाण होऊनही कोरोनाच्या संकटामुळे पक्षाने पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पण या प्रकरणात पोलिस राजकीय दबावाखाली गांधारीची भूमिका घेणार असतील तर मडिगेरी यांना ज्या प्रकारे मारहाण झाली, त्याच प्रकारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संबंधित नगरसेवकांना उत्तर दिले जाईल. शिवसेना आणि राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत दादागिरी आणि गुंडगिरीच करायची असेल, तर त्यांना यापुढे आमच्याकडूनही त्याच भाषेत उत्तर मिळेल, असा स्पष्ट इशारा भाजप नगरसेवक संदीप कस्पटे यांनी दिला आहे.

यासंदर्भात नगरसेवक संदिप कस्पटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना १ जून रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत बेदम मारहाण झाली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यासोबत मिळून राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे आणि नगरसेवक पंकज भालेकर या तिघांनी मडिगेरी यांना लाथाबुक्क्यांनी ही मारहाण केली. तेव्हापासून ते आजपर्यंत मडिगेरी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून मडिगेरी यांना मारहाण करणाऱ्यांना एक प्रकारे आणखी कोणताही गुन्हा करण्यास मोकळे सोडले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कायदा जर सर्वांना समान असेल, तर पोलिसांनी नगरसेवकांबाबतही तो त्याच पद्धतीने अंमलबजावणी केली पाहिजे. पण पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तसे झालेले नाही.

गेल्या तीन महिन्यांपासून सर्वजण कोरोना संकटाचा सामना करत आहेत. पोलिस हे कोरोना योद्धा असल्याने त्यांचा सर्वत्र सम्मान होत आहे. अशा स्थितीत भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला मारहाण झाल्यानंतर पक्षाने कोणतेही आंदोलन किंवा कडक भूमिका न घेता पोलिसांना सहकार्य केले. त्याचा कदाचित वेगळा अर्थ काढला जाऊ लागला आहे. नगरसेवकाला मारहाण होऊनही पक्ष नरमाईची भूमिका घेत असल्याचा पोलिसांना समज झाला आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड पोलिस राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या राजकीय दबावाखाली काम करून शहरवासीयांना कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा शिकवू लागले तर त्यांच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. भाजपही ते सहन करणार नाही. नगरसेवकाला मारहाण करूनही कडक कायदेशीर कारवाई होत नसेल, तर उद्या शहरात कोणीही उठेल आणि कायदा हातात घेऊन काहीही करायला तयार होईल. तसे झाले तर त्याला सर्वस्वी पिंपरी-चिंचवडचे पोलिसच जबाबदार राहतील.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विलास मडिगेरी मारहाण प्रकरणात आता तरी कडक कायदेशीर कारवाई करावी. सहा दिवस उलटूनही जर पोलिस या प्रकरणात गांधीरीची भूमिका घेणार असतील तर भाजपकडूनही कडक भूमिका घेतली जाईल. ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना ज्या प्रकारे मारहाण झाली, त्याच प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संबंधित नगरसेवकांना त्याच प्रकारे उत्तर मिळेल. त्यानंतर पोलिसांनी कायदा सर्वांना समान असतो, हे भाजपला सांगण्यासाठी येऊ नये. राज्यातील सत्तेच्या बळावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेत दादागिरी आणि गुंडगिरी सुरू केली आहे. आमचे कोणी काहीही वाकडे करणार नाही, असा या दोन्ही पक्षांचा समज झालेला आहे. पण यापुढे आता खपवून घेतले जाणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीला दादागिरी आणि गुंडगिरीच्याच भाषेत उत्तर मिळेल, असा इशारा कस्पटे यांनी दिला आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button