breaking-newsपुणे

सावरकर धर्मनिष्ठ आणि परिवर्तनवादी नेते

  • पालकमंत्री गिरीष बापट यांचे मत ; सावरकर स्मारक येथे ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना

पुणे – आपले सारे आयुष्य ज्यांनी राष्ट्रासाठी, धर्मासाठी अर्पण केले त्यांच्या विचारांना पुढे घेऊन आपण कार्य करणार आहोत, ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे. सावरकर एक धर्मनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, परिवर्तन घडविणारे नेते होते. स्वातंत्र्याचा इतिहास लिहिताना सावरकरांच्या कार्याला विसरता येणार नाही. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर आपला मानबिंदू आहेत, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्‍त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सक्षम फाऊंडेशन व सुनील मारणे यांच्यावतीने कर्वे रत्यावरील सावरकर स्मारक येथे युवकांनी सावरकरांना वंदन केले. यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत, रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघ कार्यवाह महेश करपे, आयोजक सुनील मारणे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त 100 ढोलताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात सावरकरांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रभक्‍तांचा जनसागर उसळला होता. भारत माता की जय… स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो… अशा जयघोषात युवकांनी सावरकरांना अनोखी मानवंदना दिली.
टिळक म्हणाल्या, सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी कष्ट केले, हालअपेष्टा सोसल्या. अनेकदा त्यांच्या वाट्याला अवहेलनाच आली. परंतु कोठेही डगमगून न जाता धाडसाने ब्रिटीश सत्तेविरुद्ध ते लढले. या प्रखर देशभक्‍ताला वंदन करण्याचा हा दिवस आहे.

प्रदीप रावत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातीभेद विसरून आपण सगळे एक आहोत, असा संदेश दिला. परंतु सध्या एकीचा हा भाव कमी झाल्याचे दिसते. म्हणूनच रुढी परंपरा, जातीपातींमध्ये न अडकता सावरकरांचे एकीचे विचार तरुणांनी मनात रुजविले तर नक्‍कीच देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. नू. म. वि.पथक आणि रणवाद्य पथकातील वादकांनी वादन केले. मंदार परळीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button