breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-व्हेईकलचा वापर

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • चार्जिंग केंद्रे उभारणे आदींविषयी सामंजस्य करार

मुंबई – पुढील काळात शासकीय वापरासाठीची तसेच महानगरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई व्हेईकलचा वापर वाढविणार आहे. सुलभ, सुयोग्य तसेच पर्यावरणपूरक दळणवळण व शाश्वत वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यासाठी प्रदुषणमुक्त अशा विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराचे धोरण (ई व्हेइकल पॉलिसी) तयार केली आहे. राज्यातील दळणवळण क्षेत्रात मोठे बदल करण्यासाठी आजचे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय पर्यावरण, वन मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा व इइएसएल या कंपन्यांसोबत पाच महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात होत असलेले मोठे बदल स्वीकारण्यासाठी राज्याने पुढाकार घेतला असून आम्ही वेगाने पुढे जाऊ. आता ही सुरुवात असून आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. राज्यातील विशेषतः मुंबई, पुणे व नागपूर सारख्या महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांसाठी विजेवर चालणारी वाहने वापरण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेइकल) वापर करण्यासंदर्भातील धोरणाच्या अनुषंगाने आज राज्य शासनाने शासकीय कार्यालये, सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक सेवांमध्ये ई व्हेइकलचा वापर, चार्जिंग केंद्रे उभारणे आदींविषयी सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे (युएनइपी) कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, विजेवर चालणारी वाहने व त्यासाठीची सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. सन 2030 पर्यंत सर्व वाहने ही विजेवर चालणारी आणण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. मिशन इनोव्हेशन अंतर्गत केंद्र शासनाने विविध संशोधनावर मोठा भर दिला असून त्यासाठी विविध विद्यापीठे व संस्थांची प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांची आवश्‍यकता आहे. ही वाहने स्वस्त, सहज परवडणारी असून या वाहनांसाठी वीजपुरवठाही सुलभपणे करण्यात येणार आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ व केंद्र शासन मोहीम राबविण्यात येत असून सर्वांनी पर्यावरण वाचविणे हे आपले नैतिक कर्तव्य मानून यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले.

मंत्रालय ते गेट वे प्रवास… 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ई चार्जिंग सेंटरचे उद्‌घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महोदयांनी वीजेवर चालणाऱ्या बेस्टच्या बसमधून मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर प्रवास केला. यावेळी आमदार राज पुरोहित, संयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम, महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आदींनी या बसमधून प्रवास केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button