breaking-newsपुणे

सत्तेत आमचा फक्त वापर होतो

पुणे  – सत्तेत जेवढा सन्मान मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. लोकसभा आणि विधानसभेत केवळ आमचा वापर करून घेतला जातो. कॉंग्रेसच्या काळात जे झाले तेच आताही होत असल्याची खंत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा बोलून दाखवली. आम्हाला सत्तेच स्थान दिले, महामंडळामध्ये पदे दिली तर किमान कॉंग्रेसपेक्षा चांगली संधी दिली असे म्हणता येईल. परंतु, त्याचा योग्य कधी येतोय याची वाट पाहतोय, अशा टोलाही आठवले यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

पुण्यातील सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, अनेक वर्षांपासून मनात असलेली खंत व्यक्त करत मनाला मोकळी वाट करून दिली. रिपब्लिकन पक्षाला विविध संघटनांचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांना पक्षाकडून कोणताच लाभ मिळत नाही, अशा तक्रारी येत असल्याचे आठवले यांना विचारले असता, सत्तेत राहूनही दलित समाजाच्या कार्यकर्त्यांना काही लाभ मिळाले नाहीत. पक्षात पदे वाटप करणे एवढच माझ्या हातात आहे; तर आरपीआयला सत्ता देणे हे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांच्या हातात आहे. जेव्हा सत्ताधिकार मिळेल तेव्हा सगळ्यांना न्याय देवू. आघाडी आणि आता युतीच्या काळात मला मंत्री करायचे आणि खालच्या कार्यकर्त्यांना काहीच पदे द्यायची नाहीत, अशा अनुभव आला आहे. तरीही कार्यकर्त्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही.

लोकसभा आणि विद्यानसभेत भाजप-शिवसेनेने एकत्र यावे अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची काय नाराजी आहे हे जाणून घ्यावे अशी विनंती केली आहे. शिवसेना सोबत राहिली तर महाराष्ट्रात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, शिवसेनेने युती नाही केली तर त्यांचा फटका शिवसेनेला बसू शकतो. त्यांचे लोकप्रतिनिधी फुटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे योग्यवेळी पक्षहिताचा निर्णय घेतील अशी आशा आहे. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे ट्युशन लावावी, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानावर बोलताना आठवले म्हणाले, अजित पवार यांच्याकडे “ट्युशन’ लावले तर एरीगेशन विभागाचा विषय पुढे येईल. पवार हे सिनियर आहेत, त्यांनी काही चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जे चांगले असेल तर ते घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतील, असे आठवले यांनी सांगितले.

…ते ओळखत नसले तरी मला काही फरक पडत नाही
नगर जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता, त्यांनी “कोण आठवले’ असे म्हटले. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, ते म्हटले म्हणून मी काय म्हणत नाही कोण प्रकाश आंबेडकर. ज्यांना ऐकायला विरोध करतात ते आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ते आंबेडकर. ते मला ओळखत नसले तरी संपूर्ण देश, महाराष्ट्र मला ओळखतो. त्यांच्या ओळखणे न ओळखळण्याने मला काही फरक पडत नाही. मी त्यांचा कधी अपमान केला नाही तर नेहमी आदर करतो. त्यांच्याकडून अशा शब्दांची अपेक्षा नाही. मात्र, ते माझ्याविषय वाईट बोलत असले तरी मी काही वाईट वाटणार नाही, अशी भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button