सचिन अहिर यांच्या खांद्यावर शिवसेनेच्यावतीने एक मोठी जबाबदारी
मुंबई | महाईन्यूज |
राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन अहिर यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन अहिर यांना शुभेच्छा दिल्या.
‘माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे.’ असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.तर यावर ‘पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद’ असं म्हणत सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंचे आभार व्यक्त केले आहेत…
मुंबईमध्ये सचिन अहिर यांची मोठी ताकद पाहायला मिळाली आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना विधानसभा निवडणूक जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो. सचिन अहिर यांना त्याची बक्षिसीच शिवसेनेचं उपनेतेपद बहाल करुन देण्यात आली आहे.