breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संपूर्ण राज्यात ‘चेस द व्हायरस’ मोहीम राबविणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पिंपरी |महाईन्यूज|

करोनावर लस सापडली तरी त्यासाठी कार्यक्रम राबवावा लागेल. मात्र, त्यापूर्वी संपूर्ण राज्यात येत्या महिन्यात ‘चेस द व्हायरस’ मोहीम हाती घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

राज्य सरकार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुसऱ्या जम्बो रुग्णालयाचे लोकार्पण नेहरूनगर येथे ऑनलाइन पद्धतीने झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महापौर माई ढोरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, पीएमआरडीएचे अध्यक्ष सुहास दिवसे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर या वेळी उपस्थित होते.

नैसर्गिक संकटे असतानाही अल्प कालावधीत रुग्णालय उभारून ते लोकांच्या सेवेत रुजू करण्याच्या जिद्दीचे कौतुक करून ‘शाब्बास पुणेकर’ असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, करोनाविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात आहे. संभाव्य रुग्ण शोधून त्यांची चाचणी आणि उपचार याची नितांत आवश्यकता आहे. जम्बो रुग्णालय उभारल्यानंतर ‘रिलॅक्स’ न होता कसोटीचा क्षण लक्षात घ्यावा. पावसाळी साथीच्या आजारात करोनाचा फैलाव झाल्यास भयानक संकट ओढवेल. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

आवाजावरून करोनाचे निदान करण्याची चाचणी मुंबईत चालू आहे, असे नमूद करून ठाकरे म्हणाले, ही चाचणी यशस्वी झाल्यास आपण फार मोठा टप्पा गाठू शकतो. एकदा करोनातून बरे झाल्यावर पुन्हा तो होणार नाही, हा गैरसमज असल्याचे निदर्शनास येत आहे. निर्बंधामध्ये शिथिलता आल्यास दुसरी लाट अपरिहार्य आहे. त्यामुळे सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज आहे.

या रुग्णालयाचा लाभ केवळ पिंपरी-चिंचवडकरांनाच नाही तर जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली, मुळशी या भागातील नागरिकांनाही होणार आहे. या ठिकाणी २४ तास सेवा उपलब्ध असेल. रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
टीकेची चिंता नाही.

सद्यःस्थितीत करोनासाठी जंबो रुग्णालयाची आवश्यकता आहे का? या विरोधकांच्या अक्षेपाचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. आपण सर्वत्र लढाई लढताना एकाही व्यक्तीचा जीव जाऊ नये, याचसाठी हॉस्पिटलची गरज आहे, असं पवार म्हणाले. तोच धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कोणी काहीही टीका करू द्या. त्यांचा तो अधिकार आहे. मात्र, आपण चिंता करण्याचे कारण नाही. आपण जनतेशी बांधिल आहोत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, हीच श्रीगणरायाच्या चरणी प्रार्थना!’

मगर स्टेडियमचे असं आहे जम्बो रुग्णालय

ठिकाण – कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी
रुग्णालयाचे क्षेत्रफळ – ११,८०० चौरस मीटर
अंदाजे खर्च – ८५ कोटी रुपये
खाटांची क्षमता – ८१६
ऑक्सिजनयुक्त खाटा – ६१६
आयसीयू खाटा – २००
आयसीयू निगेटिव्ह प्रेशर – ३,९०० चौरस मीटर
वीजपुरवठा – ४,००० किलो वॅट
लिक्विड ऑक्सिजन टँक – २५ हजार लिटर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button