breaking-newsक्रिडा

श्‍वेता पार्टे, ओंकार तोरगलकर यांना विजेतेपद

  • राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे – मुंबई शहरची चतुर्थ मानांकित श्‍वेता पार्टे आणि मुंबई उपनगरचा अग्रमानांकित ओंकार तोरगलकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर परस्परविरुद्ध शैलीत विजय मिळविताना येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावले. सिम्बायोसिस आयोजित ही स्पर्धा सिम्बायोसिस स्पोर्टस सेंटर, प्रभात रोड येथे सुरू आहे.

प्रत्येक गुणासाठी कडवी झुंज झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबई शहरच्या चतुर्थ मानांकित श्‍वेता पार्टेने मुंबई उपनगरच्या द्वितीय मानांकित आणि अत्यंत अनुभवी ममता प्रभूची कडवी झुंज 14-12, 16-14, 11-8, 8-11, 11-5 अशी मोडून काढताना विजेतेपदाची निश्‍चिती केली. श्‍वेता पार्टेचे या मोसमात महिला एकेरीचे हे पहिलेच राज्य विजेतेपद आहे.

श्‍वेता पार्टेने त्याआधी उपान्त्य लढतीत नागपूरच्या अग्रमानांकित मल्लिका भांडारकरचा 11-4, 7-11, 11-3, 11-8, 11-8 असा पराभव करताना खळबळजनक विजयासह अंतिम फेरीत धडक मारली होती.

श्‍वेता पार्टेने उपान्त्यपूर्व फेरीतही मुंबई शहरच्या पाचव्या मानांकित मानसी चिपळूणकरचे आव्हान 11-8, 6-11, 11-8, 14-12, 11-9 असे कडव्या लढतीनंतर मोडून काढताना उपान्त्य फेरी गाठली होती. त्याउलट द्वितीय मानांकित ममता प्रभूला उपान्त्य फेरीत मुंबई शहरच्या तृतीय मानांकित सेन्होरा डिसोझाचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी 7-11, 12-10, 11-7, 8-11, 11-7, 7-11, 11-6 अशी झुंज द्यावी लागली होती. मात्र उपान्त्यपूर्व फेरीत ममता प्रभूने मुंबई उपनगरच्या सातव्या मानांकित मृण्मयी म्हात्रेचा 11-6, 11-1, 11-5, 11-8 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडविताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये दिमाखात स्थान मिळविले होते.

अत्यंत एकतर्फी ठरलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या अग्रमानांकित ओंकार तोरगलकरने ठाण्याच्या सातव्या मानांकित युगांध झेंडेचे आव्हान 12-10, 11-6, 11-9, 11-7 असे सरळ गेममध्ये संपुष्टात आणताना मोसमातील पहिले राज्य मानांकन विजेतेपद पटकावले. यूथ मुलांच्या एकेरीत विजेतेपद पटकावणाऱ्या युगांधचे दुहेरी मुकुटाचे स्वप्न या पराभवामुळे उद्‌ध्वस्त झाले.

ओंकार तोरगलकरने त्याआधी उपान्त्य लढतीत ठाण्याच्या बिगरमानांकित दीपित पाटीलचाही 13-11, 11-5, 11-6, 11-3 असा सरळ गेममध्येच फडशा पाडताना पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. तसेच ओंकारने उपान्त्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरच्या बिगरमानांकित देव श्रॉफचा प्रतिकार 11-6, 11-9, 10-12, 11-7, 11-4 असा संपुष्टात आणताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते.

युगांधनेही दुसऱ्या उपान्त्य लढतीत मुंबई उपनगर संघाच्या बिगरमानांकित भावेश आपटेचा 11-7, 11-4, 11-6, 11-9 असा सहज मोडून काढत अंतिम फेरी गाटली होती. मात्र उपान्त्यपूर्व फेरीत ठाण्याच्या द्वितीय मानांकित झुबिन तारापोरवाला याच्यावर सनसनाटी मात करण्यासाठी युगांधला 7-11, 7-11, 11-9, 11-3, 2-11, 11-5, 11-6 असा आपला अनुभव पणाला लावावा लागला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button