breaking-newsआंतरराष्टीय

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमधील मृतांचा आकडा २९० वर, पाच भारतीयांचा समावेश

श्रीलंकेतील कोलंबो शहर रविवारी आठ बॉम्बस्फोटांनी हादरले असून या स्फोटातील मृतांचा आकडा २९० वर पोहोचला आहे. तर ५०० जण या स्फोटात जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच भारतीयांचाही समावेश आहे.

कोलंबोत रविवारी ईस्टरच्या सणावेळी चार आलिशान हॉटेल्स आणि दोन चर्चमध्ये सकाळी ८.४५ वाजता दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला. दहशतवाद्यांनी एकूण आठ बॉम्बस्फोट घडवले. या स्फोटांमधील मृतांचा आकडा सोमवारी २९० वर पोहोचला. तर ५०० जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्ल्यात एकूण ३२ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून यात ब्रिटन, अमेरिका, टर्की (तुर्कस्तान), भारत, चीन, पोर्तूगीज आणि अन्य दोन देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. भारताच्या एकूण पाच नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून श्रीलंकेतील भारतीय दुतावास स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत बहुसंख्य-अल्पसंख्य वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. श्रीलंकेतील पश्चिम भागात मशिदीवर पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला. तर मुस्लीम व्यक्तींच्या दोन दुकानांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.

सोमवारी श्रीलंकेतील संचारबंदी मागे घेण्यात आली असली तरी कोलंबोत सोमवारी सकाळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. शहरात ठिकठिकाणी सैन्याचे जवान तैनात होते, असे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. श्रीलंका सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सोशल मीडिया आणि मेसेजिंक साईट्सवर निर्बंध आणले होते. फेसबुक आणि व्हॉट्स अॅप बंद असल्याचे सांगितले जाते.

श्रीलंकेत पूर्वी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या कारवायांमुळे दहशतवाद फोफावला होता. तो २००९ मध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे यात तमिळ गटांचा हात असण्याची शक्यता नाही. हल्ल्याचे स्वरूप बघता हे आयसिस किंवा त्यांच्या एखाद्या गटाचे कृत्य असावे, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी शांततेचे आवाहन केले असून या हल्ल्याने धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. हे भ्याड हल्ले असून सरकार परिस्थिती नियंत्रणात आणत आहे असे पंतप्रधान रणिल विक्रमसिंगे यांनी म्हटले आहे. सोमवारी मैत्रीपाल सिरीसेना यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीला पंतप्रधान रणिल विक्रमसिंगे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button