पिंपरी / चिंचवडपुणे

शेतक-यांना विश्वासात घेवूनच पुढे जाणार- पालकमंत्री

– आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाला गती देण्याची ग्वाही 
– आमदार महेश लांडगे यांची बैठकीला उपस्थिती
पिंपरी –   पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी आंद्रा आणि भामा-आसखेडमधून पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भाजप सरकारने हाती घेतला आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण करीत असताना स्थानिक शेतक-यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. शेतक-यांच्या सहमतींनेच आम्ही हा प्रकल्प मार्गी लावणार आहोत, अशी ग्वाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेवून आगामी काळात वाढीव पाणी लागणार आहे. त्याची तजवीज करण्यासाठी खेड तालुक्यातील  भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दलघमी, तर आंद्रा धरणातून ३६.८७ दलघमी पाणी  शहरात आणण्यास राज्य सरकारने ६ मार्च २०१४ रोजी मंजुरी दिली आहे. मात्र, स्थानिक शेतक-यांच्याही या प्रकल्पाबाबत अनेक मागण्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात स्थानिक शेतकर्याची बेठक घेतली होती. यावेळी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार महेश लांडगे, सुरेश गोरे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले की, आंद्रा आणि भामा-आसखेड धरणाजवळील जलसंपदा विभागाची व खासगी जागा जॅकवेल, अप्रोच ब्रीज, विद्युत उपकेंद्राकरिता आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची नवलाख उंब्रे येथील जागा बॅकप्रेशर टँकसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पासंदर्भात ग्रामीण भागातील स्थानिक शेतक-यांच्या काही मागण्या आहेत. शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांना सोबत घेवूनच हा प्रकल्प आम्ही मार्गी लावणार आहोत. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले, तरी शेतक-यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पाणी उपसा करणार नाही, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री बापट यांनी दिली. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी या प्रकल्पाला सर्वोतोपरी सहकार्य करु, असा विश्वासही यावेळी उपस्थित असलेल्या शेतक-यांच्या प्रतिनिधींनी दिला.
याबाबत आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा सक्षम करण्याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला आहे. आगामी एक ते दीड वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. या प्रकल्पामुळे भोसरी विधानसभा मतदार संघासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करता येणार आहे. तसेच, आळंदीलाही गरजेनुसार शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत आम्ही प्राधान्य देणार आहोत. आगामी १० ते १५ वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील पाणी समस्या गंभीर होणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प शहरासाठी अत्यावश्यक आहे. तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा करीत आहोत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button