breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांचे सभासद व्हावे – सुभाष देशमुख यांचे आवाहन

  • बाजार समिती निवडणूकीत मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटण्यास होणार मदत

  • येत्या हंगामात यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्‍वासन

 

पुणे – बाजार समिती निवडणूकीत शेतकरी मतदानाचा क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अडी-अडचणीकडे दुर्लक्ष होत आले आहे. मात्र, मतदानाच्या अधिकारामुळे शेतकऱ्यांचे महत्त्व वाढणार आहे. बाजार समितीचे पदाधिकारी लक्ष घालून त्यांचे प्रश्‍न सोडवतील. यासाठी शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांचे सभासद व्हावे, असे आवाहन पणन, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांना सभासद न करणाऱ्या सोसायट्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. हवेली तालुक्‍यातील यशवंत सहकारी साखर कारखाना येत्या हंगामात सुरू करण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.
पुणे हवेली तालुका बाजार समिती पुर्नस्थापित केल्याबद्दल देशमुख यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ते बोलत होते. त्यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी.जे.देशमुख, माजी उपमुख्य प्रशासक भूषण तुपे, हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष रोहिदास उंद्रे, बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे माजी सदस्य, भाजप विविध पदाधिकारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारी एक मोठी शक्ती आहे. ती विविध कारणाने अडथळा आणत आहे. यातील लोकांनी तेथील थोडी जमिन खरेदी केली आहे. आता उर्वरित जमिन खरेदीसाठी यांच्याकडून डाव आखण्यात येत आहेत. जागा भाड्याने घेण्यासाठी आलेल्यांना खोटे बोलून माघारी पाठविले जाते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे मॉडेल म्हणून राज्य सरकारलाच हा कारखान चालवता येतोय का बघा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले आहे. येत्या हंगामात हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारकडून घेण्यात येत आहेत. शेतकऱ्याऐवजी खरेदीदारांकडून आडत वसुल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर बाजार समिती निवडणूकीत शेतकऱ्यांना मतदान करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वजन काटा दोष, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, लिलावापेक्षा कमी भाव मिळणे, या आणि विविध समस्यांवर शेतकऱ्यांना आवाठ उठविता येणार आहे. पूर्वी अशा प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जायचे. मात्र, आता शेतकरीच मतदार असल्याने हे प्रश्‍न प्राधान्याने सोडविले जातील.
पाचर्णे म्हणाले, हवेली तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने दोनच मागण्या होत्या. त्यातील पहिली मागणी म्हणजे हवेली बाजार समिती पुर्नस्थापना करणे. दुसरी मागणी म्हणजे तालुक्‍यातील यशवंत सहकारी साखर कारखान सुरू करणे. त्यापैकी बाजार समितीची मागणी पूर्ण झाली आहे. तब्बल 14 वर्षांनी हवेली तालुक्‍यातील नागरिकांचा वनवास संपला आहे. ही मागणी पूर्ण झाली आहे. आता लवकरच यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button