breaking-newsमहाराष्ट्र

शिवसेनेच्या ‘स्वबळा’ला उमेदवारांची चणचण

आगामी निवडणुका ‘स्वबळा’वर लढण्याची गर्जना शिवसेनेने केली असली तरी पक्षाची संघटनात्मक ताकद राज्यात सर्वत्र पुरेशी प्रभावी नसल्याने केवळ लोकसभा निवडणुकीचा विचार करता राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात उमेदवार मिळणे कठीण जाणार असल्याचे चित्र शिवसेनेने घेतलेल्या लोकसभा मतदारसंघांच्या आढाव्यातून समोर आले आहे. स्वबळासाठी स्वपक्षीय उमेदवारांची चणचण भासणार असल्याने इतर पक्षांत उमेदवारांचा शोध घेण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केले आहे.

राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा प्रदेशनिहाय आढावा घेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी काही काळापासून सुरू केले आहे. मागील आठवडय़ात मुंबईतील बैठकांमध्ये विदर्भ, मुंबई परिसरातील मतदारसंघांचा आढावा ठाकरे यांनी घेतला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याबाबत गळ घातली.

दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाल्याने शिवसैनिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे ताकदीने स्वबळाच्या तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीत दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका विभागाचा आढावा घेताना इतर पक्षांतूनही चांगले उमेदवार आणायची वेळ येईल. त्यावेळी पक्षाचा विचार करून त्यांना सहकार्य करायची तयारी ठेवा, असे सांगत उद्धव यांनी बाहेरून उमेदवार आणावे लागतील, असे संकेत दिले.

मुंबई, कोकण, काही प्रमाणात मराठवाडा वगळता राज्यात शिवसेनेची ताकद नाही. राज्याच्या अनेक भागात संघटनात्मक ताकदीचा अभाव ही शिवसेनेची मर्यादा आहे. आढावा बैठकांमध्ये ठाकरे यांना त्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी स्वपक्षीयांना समजुतीने घेण्याचा सूर लावला आहे. भाजपच्या पावलावर पाऊल टाकून शिवसेनाही आता बाहेरच्या लोकांना उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याचे त्यातून स्पष्ट झाले.

एकीकडे भाजप बाहेरच्या लोकांना घेत असताना त्यास पक्षाचे काँग्रेसीकरण केल्याची टीका करायची. पण शिवसेनाही बाहेरच्यांना उमेदवारी देण्याची भाषा करत असल्याने शिवसेना-भाजपमध्ये फरक काय, याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना विचारले असता, भाजपने पक्षाच्या विस्ताराच्या नावाखाली आपली भूमिका सोडली.

उदाहरणार्थ काश्मीरमध्ये पीडीपीसह युती केली. आता पुन्हा तोडली. पण शिवसेना आपल्या भूमिकेवर कायम आहे. काश्मीर असो की केंद्र सरकारचे अनेक त्रासदायक निर्णय शिवसेनेने कायम आपली विरोधातील भूमिका मांडली आहे. भूमिका कधीही सोडलेली नाही, असे उत्तर गोऱ्हे यांनी दिले.

राजकारणात पक्षनिष्ठा महत्त्वाची असतेच. पण निवडणुकीच्या राजकारणात जनाधार-लोकप्रियता, निवडून येण्याची क्षमता असे मुद्देही महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत या निकषांवर कोणाला पक्षात घ्यायचे किंवा उमेदवारी द्यायची याचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील.  – डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button