breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना गटनेते राहूल कलाटे आणि नगरसेवक नवनाथ जगताप यांची राष्ट्रवादीशी जवळीक

  • युवा नेते पार्थ पवार यांची घेतली भेट
  • राजकीय वर्तुळात मांडले जातायत तर्क वितर्क

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पदाधिका-यांच्या भूमिका बदलू लागल्या आहेत. एरव्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा ‘जप’ करणारे विरोधक आता राष्ट्रवादीच्याच वळचणीचा आधार शोधू लागले आहेत. महापालिकेतील शिवसेना गटनेते राहूल कलाटे तसेच भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातले सदस्य असलेले अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी काल रात्री राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने शहरातील राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत.

पिंपरी-चिंचवड महपालिकेच्या राजकारणात सदैव विरोधी पक्षाची भूमिका बजावणा-या शिवसेनेचे नेते कायमच राष्ट्रवादीच्या विरोधात उभे राहिले आहेत. दोन दिवसांपूर्वी दस्तुरखुद्द खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदार संघातील पार्थ पवार यांच्या लोकप्रियतेवर टिका केली. कोण हा पार्थ पवार?, मी त्याला ओळखत नाही. असे कितीही पवार आले, तरी मी त्यांना घाबरत नाही, असे वक्तव्य केले. त्यातच खासदार बारणे यांच्याच गटात राहून पालिकेतील शिवसेनेची धुरा सांभाळणारे गटनेते राहूल कलाटे यांनी काल रात्री पार्थ पवार यांची निगडी येथे भेट घेतली. यावरून शिवसेनेत नेमके चाललेय तरी काय, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातले सदस्य असलेले अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी देखील पार्थ पवार यांची आवर्जुन भेट घेतली. महापालिकेत भाजपची सत्ता येण्यापूर्वी आमदार जगतापांनी ज्यावेळी राष्ट्रवादीच्या विरोधात रणशिंग फुकले. त्यात नवनाथ जगताप भाऊंच्या सोबत होते. त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात खासगीत मतमतांतरे मांडली. आता तेच नवनाथ जगताप भाऊंच्या विरोधात उभे असल्याचे दाखवित सुटले आहेत. त्यांच्या भाऊ विरोधी बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा आणि कितपत ठेवायचा नाही, याबाबत ऐकणारेच बुचकळ्यात पडतात. आता या जगतापांनी सुध्दा पार्थ पवार यांची गळाभेट घेतली. पार्थ पवार यांच्यासोबत तासभर चर्चा करून त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी देखील होते.

या समारंभाचे साधले निमित्त 

निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर संदीप कदम यांच्या स्मरणार्थ एलआयजी ग्रुपच्या वतीने क्रिकेट तोरणामेंट भरविण्यात आल्या होत्या. त्यातील विजयी संघाचे बक्षिस वितरण पार्थ पवार यांच्या हस्ते झाले. बक्षिस वितरणानंतर राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ यांच्या घरी स्नेहभोजनासाठी पार्थ यांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी गटनेते कलाटे, नगरसेवक जगताप आणि माजी नगरसेवक शेट्टी यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. मोबाईलमध्ये फोटो सुध्दा काढले आणि ते सर्वाधीक व्हायरल व्हावेत म्हणून सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button