शिक्षण प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांचे पदावनत
पराग मुंढे यांच्याकडे सर्वाधिकार, आयुक्तांचा आदेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांचे पुण्यातील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयात उपशिक्षणाधिकारी म्हणून पदावनत झाल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचे सर्वाधिकार सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांना दिले आहेत. त्यासंदर्भात आयुक्तांनी सोमवारी (दि. 21) सायंकाळी रितसर आदेश काढला आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी कारेकर यांची बदली झाल्यानंतर या पदावर बी. एस आवारी यांची एक वर्षासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांना पुण्यातील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयात उपशिक्षणाधिकारी पदावर पदावनत करण्यात आले. त्यामुळे त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ विभागातून कार्यमूक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी शासनाचा अधिकारी नियुक्त होईपर्यंत प्रशासन अधिकारी पदाचे अधिकार सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. त्यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी सायंकाळी आदेश काढला आहे.
बी. आस. आवारी यांच्याकडे प्राथमिक विभागासह पालिकेच्या माध्यमिक विभागाचे देखील अधिकार देण्यात आले होते. प्राथमिक शाळांबरोबरच माध्यमिक शाळांचा देखील कारभार त्यांना पहावा लागत होता. त्यांचे पदावनत झाल्याने प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही विभागाचा कार्यभार मुंढे यांच्याकडे देण्यात आला आहे.