breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणावरून सभागृहात विरोधकांचा राडा, सभा तहकुबीची नामुष्की

  • आठ ते दहा लाखांचा शिक्षकांकडून व्यवहार झाल्याचा आरोप
  • भाजपच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा ठेवला ठपका

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाच्या विषयावरून आज सर्वसाधारण सेभेत सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. महापौर राहूल जाधव यांनी या विषयावर नगरसेवकांना बोलण्याची संधी न देता घाईघाईत विषय मंजूर केल्याने विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शिक्षक सेवा वर्गीकरणाच्या विषयात एका-एका शिक्षकाकडून आठ ते दहा लाख रुपये भाजपच्या पदाधिका-यांनी घेतले आहेत, असा आरोप करत सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी सभा कामकाज बंद पाडल्याने सायंकाळी पाचपर्यंत सभा तहकूब करण्यात आली.

महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा आज गुरुवारी (दि. 20) घेण्यात आली. विषय पत्रिकेवरील सहा क्रमांकाचा शिक्षक वर्गीकरणाचा विषय मांडला जात होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या विषयावर चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, सत्ताधारी भाजपने मागणी धुडकावून लावत सातव्या क्रमांकाचा विषय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली.

विरोधकांना बोलू दिले जात नाही. मानधनावरील शिक्षक भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला. काही पदाधिकाऱ्यांनी सेवा वर्गीकरणाच्या नावाखाली शिक्षकांकडून पाच ते दहा लाख रुपये घेतले आहेत. या विषयावर आम्हाला बोलायचे होते. मात्र, भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येईल म्हणून आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप दत्ता साने यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या मांडला होता. शेवटी महापौरांनी ही सभा सायंकाळी पाचपर्यंत तहकूब ठेवली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button